मुंबई, 1 नोव्हेंबर : भाजपने मुख्यमंत्रिपद देण्यास अनुकूलता न दाखवल्याने शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत गेल्या तीन दिवसांपासून भाजपवर उघड टीका करत आहेत. ‘भाजप दिलेला शब्द पाळत नसून आमच्यासमोर इतरही पर्याय उपलब्ध आहेत,’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. त्यानंतर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे. ‘संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया शिवसेनेची अधिकृत प्रतिक्रिया नाही. सत्ता स्थापनेविषयी चर्चा करण्याचा अधिकार आमच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आहे, तर शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसंच एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा वक्तव्याला आम्ही दुजोरा देत नाही,’ असा पलटवार प्रसाद लाड यांनी केला आहे. काय म्हणाले होते संजय राऊत? ‘लिहून घ्या, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आहे’ असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असतानाच एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावरही संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. काहीही झालं तरी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यामुळे त्याच नियमांनुसार आताही जागेची वाटणी व्हावी अशी शिवसेनेची भूमिका आहे असं संजय राऊत म्हणाले. तर तसं नाही झालं तर आम्ही बहुमताने सरकार स्थापन करू असंही राऊतांनी स्पष्ट केलं. स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करेल आणि महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.