रत्नागिरी, 2 फेब्रुवारी : आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने खाते उघडले असून, भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत. त्यांनी शेकपचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना वीस हजार मतं पडली आहेत, तर बाळाराम पाटील यांना अवघ्या 9 हजार 500 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयानं भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत उत्साहाचं वातावरण आहे. उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी या विजयाबद्दल म्हात्रे यांचं अभिनंदन केलं आहे. नेमकं काय म्हणाले सामंत? भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे कोकण शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले आहेत, त्यांनी शेकपचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला. या विजयानंतर उदय सामंत यांनी म्हात्रे यांचं अभिनंदरन केलं आहे. ‘विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचा विजय हा शिंदे - फडणवीस सरकारवरील कोकणवासीयांनी दाखविलेला विश्वास आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!’ असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. सत्यजित तांबे यांचे निकटवर्तीय मानस पगार यांचे अपघाती निधन म्हात्रेंची प्रतिक्रिया दरम्यान विजयनंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा माझा एकट्याचा विजय नाही, हा माझ्या मतदारसंघातून संपूर्ण शिक्षकांचा विजय आहे. मी गेल्या सहा वर्षांमध्ये जे काम केलं त्याची पोचपावती मला माझ्या मतदारसंघातील शिक्षकांनी दिली. तब्बल 33 संघटनांचा आम्हाला पाठिंबा होता. मुख्यमंत्री आणि पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो’ असं म्हात्रे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.