नाशिक, 2 फेब्रुवारी : नाशिक जिल्ह्यातून एक धक्क्दायक बातमी समोर आली आहे. नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले आहे. मानस पगार हे युवक काँग्रेसमधील चर्चेतला चेहरा म्हणून ओळखले जायचे. तसेच सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. काँग्रेसची भूमिका सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे मांडत. त्यामुळे पक्षानेही त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या निधनानंतर सत्यजीत तांबे यांनी शोक व्यक्त केला आहे. काय म्हणाले सत्यजीत तांबे - “भावपूर्ण श्रद्धांजली. माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे”, या शब्दात सत्यजीत तांबे यांनी शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा - Hasan Mushrif KDCC ED Investigation : कोल्हापूर जिल्हा बँकेसह मुश्रीफांच्या कार्यालयांची मध्यरात्रीपर्यंत चौकशी, ईडीला काय मिळाले? रोहित पवारांनीही शेअर केली फेसबुक पोस्ट माझा मित्र आणि युवक काँग्रेसचा पदाधिकारी मानस पगार याचं अपघाती निधन झाल्याची मन सुन्न करणारी बातमी समजली. या दुःखद प्रसंगी मी त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!, अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट फेसबुकवर शेअर केली.
2019 मध्ये काँग्रेसने विधानसभा निवडणुकीवेळी सुपर सिक्स्टी अभियान राबविले होते. याच धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून 2020मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युवा जोडो अभियान (सुपर 1000) अभियान राबवण्यात आले. या अभियानासाठी मानस पगार यांच्याकडे मुख्य समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली होती.