मुंबई, 28 फेब्रुवारी : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आरोपी मंत्री संजय राठोड यांनी आज दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातील जनतेचा आणि प्रसार माध्यमांचा दबाव आणि भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे संजय राठोड यांनी राजीनामा जरी दिला असला तरीही हे प्रकरण अजून संपलेले नाही. जेव्हा पूजा चव्हाणला न्याय मिळेल, तेव्हाच सत्याचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांची सोमवारी मंत्रिमंडळातून हकालपट्टी न केल्यास सोमवारपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप सभागृहाचे कामकाज करू देणार नाही, असा इशारा पाटील यांनी शनिवारी दिला होता.
संजय राठोड प्रकरण चर्चेत असतानाच चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेही एक मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत असाच निर्णय घेतला पाहिजे, असं पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्या या मागणीमुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे प्रकरण चर्चेत आलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतील एका महिलेने गंभीर आरोप केले होते. मात्र सदर महिलेने नंतर आपली तक्रार मागे घेतली.
हेही वाचा - पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी मुख्यमंत्र्यांना भेटताच हातात दिलं हे पत्र, नेमकं काय लिहिलं? संपूर्ण वाचा
दरम्यान, चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेच्या निरंतर दबावामुळेच तसंच चित्रा वाघ आणि उमा खापरे यांच्या नेतृत्वात भाजपाच्या कार्यकर्त्यांमुळे मुख्यमंत्र्यांना अखेर हा निर्णय घ्यावा लागला. या प्रकरणात पोलिसांनी आतापासूनच स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने काम करावे आणि पूजा चव्हाण हिला न्याय द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.