मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गोंदियात राष्ट्रवादीला मोठा झटका, जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत विजय शिवणकर करणार भाजपत प्रवेश

गोंदियात राष्ट्रवादीला मोठा झटका, जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत विजय शिवणकर करणार भाजपत प्रवेश

राष्ट्रवादीला मोठा झटका, जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत विजय शिवणकर करणार भाजप प्रवेश

राष्ट्रवादीला मोठा झटका, जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत विजय शिवणकर करणार भाजप प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्षाकडून एक मोठा धक्का मिळाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

गोंदिया, 16 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) एक मोठा धक्का बसला आहे. कारण, गोंदियातील (Gondia) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्याचे माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचे पुत्र आणि गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर (Vijay Shivankar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. विजय शिवणकर हे प्रफुल पटेल (Praful Patel) यांचे निकटवर्तीय मानले जातात. (NCP Gondia district president Vijay Shivankar likely to join BJP)

जिल्हा परिषद निवडणूक समोर असतांना विजय शिवणकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काहीच आलबेल नाही हे सिद्ध झाले असून त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्षाशी नाराज असल्याचे म्हटले आहे.

विजय शिवणकर यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस साठी मोठा धक्का मनाला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय शिवणकर हे आज भारतीय जनता पक्षात (BJP) अधिकृत प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विजय शिवणकर हे नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आपल्या मनगटावरील राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा : देगलूरमध्ये भाजपला हरवणारे अशोक चव्हाण गडकरींच्या भेटीला, 'या' मुद्यावर झाली चर्चा!

शरद पवार विदर्भ दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्यापासून चार दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विदर्भात मुक्कामाला राहणार असून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यात प्रत्यक्ष जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमीरा लागल्यानंतर विदर्भात राष्ट्रवादी काहीशी वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र शरद पवारांच्या या दौऱ्याने राष्ट्रवादीला नवी उभारणी मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात विदर्भातील नागपूर अमरावती चंद्रपूर या महानगरपालिका सोबतच काही जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांच्या देखील निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा हा दौरा राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

असा असेल शरद पवारांचा दौरा

17 नोव्हेंबर -

कामठी येथे नागपूर ग्रामीण कार्यकर्त्यांचा मेळावा, दुपारी तीन वाजता विदर्भ नाक चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये व्यापार्‍यांसोबत बैठक, सायंकाळी सहा वाजता नागपूर शहर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा

18 नोव्हेंबर -

गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

19 नोव्हेंबर -

सकाळी चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आणि दुपारी यवतमाळ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

20 नोव्हेंबर -

वर्धा येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा त्यानंतर सायंकाळी नागपूर विमानतळावरून वरून पुढील कार्यक्रमाला रवाना

वर्धा जिल्ह्यात भाजपला धक्का

तर तिकडे वर्धा जिल्ह्यात भाजपला एक धक्का बसला आहे. कारण, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत 15 नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भाजपची शेतकरी विरोधी बूमिका, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी यामुळे जनता त्रस्त झालेली आहे. या सर्वांना कंटाळून वर्धा जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी सोमवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेनुगोपाल, प्रदेश प्रभारी एच के पाटील, पालकमंत्री सुनील केदार, रणजित कांबळे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या उपस्थितीत डॉ. शिरीष गोडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

First published:

Tags: BJP, NCP, Prafull patel