दिल्ली, 26 मार्च : मानहानीच्या एका खटल्यामध्ये न्यायालयानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवले होते. त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांंधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून देशात सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला आहे.
ट्विटर अकाऊंटमध्ये बदल
दरम्यान खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटमध्ये एक बदल केला आहे. या बदलाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या वॉलवर आपल्याबद्दल माहिती देताना 'Dis’Qualified MP' असा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटमध्ये केलेल्या बदलाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
दरम्यान राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. खासदारकी रद्द करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र मी गप्प बसणार नाही. मी सत्य बोलतो त्यालाच सत्ताधारी घाबरतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. दरम्यान पूर्वी प्रसारमाध्यमं आणि इतर संस्था विरोधकांना देखील योग्य ते सहकार्य करायच्या मात्र आता तसं होताना दिसत नाही, त्यामुळे आता थेट जनतेमध्ये गेल्याशिवया पर्याय नाही. म्हणूनच आम्ही भारत जोडो यात्रा काढल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Court, Rahul gandhi, Twitter