भंडारा, 08 ऑक्टोंबर : भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मागच्या आठ दिवसांपूर्वी काकांचे निधन झाले होते त्यांच्या अस्थि विसर्जनाकरीता आलेल्या पुतण्याचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान यामध्ये 4 जण वाहून गेले होते यातील तिघे थोडक्यात बचावले आहेत. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माडगी नदीघाटावर काल (दि. 07) दुपारी 12 च्या सुमारास घडली. प्रणिकेत शिवराम पराते (वय 22, रा. सरांडी ता. तिरोडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर संस्कृत सोराते (वय 16), रेतन सोरते (वय 17), सुनील पराते (वय 35) तिघेही (रा. देवरी, जि. गोंदिया) असे बचावलेल्या नातेवाईकांची नावे आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील प्रणिकेतचे काका नरेंद्र बुधाजी पराते (वय 50, रा. देवरी, जि. गोंदिया) यांचे आठवडाभरापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमाकरीता पराते कुटुंबीय माडगी येथील वैनगंगा नदीघाटावर आले होते. वैनगंगेच्या पात्रात मोक्षविधी पार पाडताना कुटुंबातील संस्कृत, रेतन, सुनीलसह प्रणिकेत पाण्यात उतरले.
हे ही वाचा : VIDEO: रस्त्यावर ही चूक करत असाल तर सावधान, पुण्यात फुलबॉलप्रमाणे हवेत उडून खाली कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू
परंतु, त्यांचा पाण्याचा अंदाज चुकला व चौघेही पाण्यात बुडाले. प्रसंगावधान राखत कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या बचावाकरिता धावले. त्यात संस्कृत, रेतन, सुनील हे थोडक्यात बचावले. तर प्रणिकेत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
सदर प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी करडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. प्रणिकेत गवसत नसल्याने एनडीआरएफची चमू पाचारण करण्यात आली. घटनास्थळावर स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. करडी पोलिसांच्या मदतीने एनडीआरएफ चमूने तीन तासांनी प्रणिकेतचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
हे ही वाचा : ‘अयोध्येत सुसाईड बॉम्बर’ PFI ची उघड धमकी; मोदी, शहा, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे सुद्धा टार्गेटवर!
घटनेची नोंद करून करडी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता तुमसर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. अधिक तपास करडीचे ठाणेदार आर. डी. गायकवाड करीत आहेत.