नेहाल भुरे, प्रतिनिधी
भंडारा, 19 ऑक्टोबर : वीज बिल भरण्याच्या नावाखाली भंडारा येथील न्यायाधीशांना एका भामट्याने तीन लाख रुपयाने ऑनलाइन फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा येथील चारुदत्त देशपांडे असे न्यायाधीशांचे नाव आहे. ऑनलाईन वीज बील भरण्यावरून त्यांची फसवणूक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा येथील न्यायाधीश चारुदत्त लक्ष्मीकांत देशपांडे यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला होता. त्यात वीज बिल थकीत असून तत्काळ न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असे म्हटले. यावरून न्या. देशपांडे यांनी संबंधित नंबरवर फोन केला. तेव्हा क्विक सपोर्ट हे ऐप इन्स्टॉल करण्यास सांगून त्यावर आलेली लिंक शेअर करून 11 रुपये पाठविण्यास सांगितले.
हे ही वाचा : नशीबवान दाम्पत्य! प्रत्येक महिन्याला पिझ्झा मिळणार मोफत, पाहा काय आहे प्रकरण
न्या. देशपांडे यांनी 11 रुपये नेट बँकिंगद्वारे जमा केले असता त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून पहिल्यांदा 99 हजार 990 रुपये, दुसऱ्यांदा पुन्हा तेवढेच आणि तिसऱ्यांदा 99 हजार 998 रुपये असे एकूण 2 लाख 99 हजार 978 रुपये एका क्रेडिट कार्डद्वारे ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले. हा प्रकार लक्षात येताच न्या. देशपांडे यांनी भंडारा ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.
नवी मुंबईत स्विगीकडून एकाची फसवणूक
सध्या ऑनलाईनचा जमाना आल्याने नागरिकांचा ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढल्याचे दिसून येत आहे. घरबसल्या आपल्या मनासारखी शॉपिंग असो कि खाद्य पदार्थ हे आपल्या फोनवर बुक करून काही क्षणात आपल्या घरी येतं म्हणून बरेच लोकं ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देत आहेत. मात्र ऑनलाईन खरेदीमध्ये ग्राहकांची फसवणूक होते असे अनेक किस्से आहेत. काही जणांनी मोबाईल मागवल्यानंतर साबण आला आहे तर काहींनी चप्पल मागवल्यानंतर दगड आल्याचे किस्से आपण ऐकत आलो आहोत. अशीच एक घटना नवी मुंबईतील घणसोली येथे घडली आहे.
हे ही वाचा : कोणीतरी गिफ्ट पाठवलं म्हणून तरुणीनं आनंदानं उघडलं, पण क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं
नवी मुंबईतील घणसोली येथे राहणारे चंद्रकांत कवलगे यांनी ऑनलाईन केकची ऑर्डर केली होती. काही वेळाने त्यांच्याकडे स्विगी कपंनीच्या डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेला केक व पेस्ट्री घेऊन आला. मात्र ऑर्डर केलेल्या केकमध्ये व प्रत्यक्ष डिलिव्हरी घेऊन आलेल्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे चंद्रकांत कवलगे यांच्या निदर्शनास आले. हे सर्व पाहिल्यावर आपली फसवणूक झाली आहे असं समजल्यावर चंद्रकांत कवलगे यांनी डिलिव्हरी बॉय घेऊन आलेल्या साहित्यासह व्हिडीओ बनवला.