नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : पिझ्झाची आता कोणाला ओळख करून देण्याची गरजच राहिली नाही. ऑर्डर केल्यानंतर अर्ध्या तासात घरपोच पिझ्झा आला नाही तर मोफत पिझ्झा, किंवा एकावर एक पिझ्झा फ्री, अशा आकर्षक जाहिरातींमुळे तो कायमच चर्चेत असतो. आतादेखील बहुराष्ट्रीय रेस्टॉरंट चेन पिझ्झा हट (Pizza Hut) ने भारतातील एका दाम्पत्याला पुढील वर्षभर प्रत्येक महिन्याला पिझ्झा फ्री देण्याची घोषणा केली आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय.
आसाम येथील शांती प्रसाद आणि मिंटू राय ही जोडी काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या लग्नात केलेल्या विचित्र करारामुळे चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा या जोडप्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या दोघांचा 21 जून 2022 रोजी विवाह झाला होता. लग्नात अग्निभोवती सात फेरे घेतल्यानंतर, जोडप्यानं एका कागदावर स्वाक्षरी करीत एक करार केला होता. ज्यामध्ये संसार सुरू असताना कोणत्या गोष्टी करायच्या, व कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, अशा स्वरुपाची यादीच होती. या यादीमध्ये दररोज जिममध्ये जाणं, दर 15 दिवसांनी शॉपिंग करणं आणि दर महिन्याला पिझ्झा खाणं समाविष्ट होतं.
हेही वाचा - कोणीतरी गिफ्ट पाठवलं म्हणून तरुणीनं आनंदानं उघडलं, पण क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं
या दोघांच्या लग्नाला काही महिने उलटले असून, ते या सर्व अटींचं पालन करत आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या जोडप्याला बहुराष्ट्रीय रेस्टॉरंट चेन पिझ्झा हटने पुढील वर्षभर दर महिन्याला पिझ्झा देण्याचं ठरवलं आहे.
करवा चौथच्या निमित्तानं, पिझ्झा हट इंडियानं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर घोषणा केली की, ते या जोडप्याला पुढील वर्षभर महिन्यातून एकदा मोफत पिझ्झा देतील.
व्हिडिओ केला शेअर
पिझ्झा हटने एक व्हिडिओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'माझ्या पतीसोबत दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी दर महिन्याला पिझ्झा फ्री!' या व्हिडिओमध्ये एक जोडपं जवळच्या पिझ्झा हट आउटलेटमध्ये चालत असल्याचे दाखवलं आहे, जिथे त्यांनी विविध प्रकारच्या स्वादिष्ट पिझ्झाचा आनंद घेतला. पिझ्झाची ऑर्डर येईपर्यंत दोघेही एकत्र सेल्फी घेताना दिसले.
पिझ्झा हट इंडियाने गुरुवारी ही पोस्ट शेअर केली असून, तेव्हापासून व्हिडिओला जवळपास 30,000 व्ह्युज आणि 1,300 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी त्यावर कमेंट दिल्या असून एका यूजरने लिहिलं, 'फ्री पिझ्झासाठी हे निन्जा टेक्निक आहे का?' दुसरीकडे, हे जोडपं एका वर्षासाठी पिझ्झा हटचे ब्रँड अॅम्बेसेडर बनले असून, जे पिझ्झा हटमध्ये जाऊन पिझ्झाचा आनंद घेऊ शकतात असं एकाने म्हटलंय.
दरम्यान, शांती प्रसाद आणि मिंटू राय यांनी लग्नात ज्या कागदावर स्वाक्षरी केली त्या कागदावरील इतर गोष्टी करण्याचं मान्य केलं होत. पण त्या पूर्ण झाल्या असोत किंवा नसोत, त्या दोघांना मात्र प्रत्येक महिन्याला पिझ्झा मोफत मिळाल्यानं त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Pizza, Viral news