मुंबई, 6 डिसेंबर : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेला सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सध्या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण आहे. या सीमावादामुळे कर्नाटकात महाराष्ट्राच्या काही वाहनांवर हल्ले झाले. तर दुसरीकडे या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात कर्नाटकातील अनेक सरकारी बसेसना काळे फासले. खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य संघटनेनेही कन्नडिगांविरोधात आंदोलन केलं.
या सीमावादावरून दोन्ही राज्यांमधील वाद वाढल्याने राजकारणही तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून राज्यातील बसेसला लक्ष्य केल्याबद्दल चिंता व्यक्त केली. दुसरीकडे, विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने हा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली.
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाशी संबंधित काही खास गोष्टी..
कर्नाटकातील बेळगावी आणि इतर काही मराठी भाषिक गावांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याची मागणी महाराष्ट्र अनेक दिवसांपासून करत आहे. 1960 च्या दशकात राज्यांच्या भाषा-आधारित पुनर्रचनेदरम्यान हे मराठी-बहुल क्षेत्र कन्नड-बहुल कर्नाटकाला चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा महाराष्ट्राचा आरोप आहे.
त्याचवेळी, सीएम बोम्मई यांनी नुकतीच महाराष्ट्रातील अक्कलकोट आणि सोलापूर या कन्नड भाषिक भागांचा कर्नाटकात समावेश करावा, अशी मागणी केली. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांतील लोकांना दक्षिणेकडील राज्यात सामील व्हायचे आहे, असेही ते म्हणाले.
वाचा - '24 तासांत हल्ले थांबले नाहीतर...', शरद पवारांचा कर्नाटक सरकारला कडक इशारा
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाचे हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत बोम्मई म्हणाले की, सीमावादावरील कायदेशीर लढाई कर्नाटक जिंकेल, असा विश्वास आहे, कारण राज्याची भूमिका कायदेशीर आणि घटनात्मक दोन्ही आहे.
एवढी वर्षे जुनी ही बाब पुन्हा दोन राज्यांमधील तणावाचे कारण कशी बनली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याची सुरुवात बेळगावी येथील कन्नड विद्यार्थ्याला कथित मारहाणीपासून झाली. कॉलेज फेस्टिव्हलमध्ये कर्नाटकचा झेंडा फडकवल्याबद्दल या विद्यार्थ्याला मराठी विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
कर्नाटक रक्षण वेदिके नावाच्या संघटनेने याचा तीव्र निषेध केला. यादरम्यान महाराष्ट्र क्रमांकाच्या अनेक वाहनांना लक्ष्य करून त्यांच्या काचा फोडल्याचे वृत्त आहे.
याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांच्या राज्यांच्या सीमावर्ती भागातील सध्याच्या तणावाबाबत चर्चा केली. कर्नाटकातील अनेक भागात महाराष्ट्राच्या बसेसवर झालेल्या हल्ल्यांबाबत फडणवीस यांनी निराशा व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
वाचा - बेळगावात महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्या, फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी फडणवीस यांना महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व बसेसना सुरक्षा देण्याचे आणि सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला असून, सरकार हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्यास त्यांचा पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. पवार म्हणाले, 'मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलूनही त्यांनी (कर्नाटक) या विषयावर कोणतीही हयगय दाखवली नाही. आमच्या (महाराष्ट्राच्या) संयमाची कोणीही परीक्षा घेऊ नये आणि ती चुकीच्या दिशेने जाऊ नये.
दोन्ही राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने या प्रदीर्घ सीमावादासाठी जवाहरलाल नेहरूंना जबाबदार धरले आहे. भाजपचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद हा खरे तर दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा वारसा आहे."
दरम्यान, सीमावादावर समन्वय साधण्यासाठी नियुक्त केलेले महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे मंगळवारी बेळगावी दौऱ्यावर येणार होते, मात्र त्यांचा दौरा तूर्तास पुढे ढकलण्यात आल्याचे दिसत आहे. या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होईल या भीतीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते थांबवण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर सीमा वादासंदर्भात बैठक बोलावली, ज्यामध्ये अनेक ज्येष्ठ मंत्रीही उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.