जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अखेर समोर आली पंकजांची 'मन की बात', उपहासात्मक बोलण्यात दडलाय मोठा अर्थ?

अखेर समोर आली पंकजांची 'मन की बात', उपहासात्मक बोलण्यात दडलाय मोठा अर्थ?

भाजप नेत्या पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात मात्र तसं काहीच घडलं नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑगस्ट : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार दोन दिवसांपूर्वीच झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात मात्र तसं काहीच घडलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत का? अशा चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, पंकजा यांनी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने रासप नेते महादेव जानकर यांना राखी बांधली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उपहासात्मक उत्तर दिलं. ‘आपली मंत्रीपदाची पात्रता नाही. त्यामुळे आपल्याला संधी दिली नसेल’, असं विधान पंकजा यांनी केलं. पण त्यांच्या या उपहासात्मक विधानावरुन त्यांना मंत्रीपद हवं होतं हे स्पष्ट झालंय. पण त्यांची ‘मन की बात’ भाजपश्रेष्ठींनी ऐकली नाही. विशेष भाजप पक्षश्रेष्ठींनी म्हणजे पंकजा यांच्या ‘मन की बात’ न ऐकण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील तशी घटना घडली आहे. दीड महिन्यांपूर्वी राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्यावेळी देखील पंकजा यांनी आमदार होण्याची मनातील भावना बोलून दाखवली होती. पण त्यांनी ही भावना प्रत्यक्ष न व्यक्त करता अप्रत्यक्षपणे व्यक्त केली होती. आपल्याला विधान परिषदेची संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. पण तरीही त्यांना संधी मिळाली नव्हती. त्यानंतर मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं. विशेष म्हणजे पंकजा यांच्या अहमदनगरमधील एका समर्थकाने तर थेट विष घेवून या गोष्टीचा निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं होतं. पण तरीही पंकजा यांना पक्षाकडून संधी मिळाली नव्हती. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा आदेश दिला. हा फडणवीसांना धक्का होता. फडणवीस त्यामुळे नाराजही झाले होते. फडणवीसांना पुन्हा धक्का देण्यासाठी पक्षश्रेष्ठी पंकजा यांना मंत्रिमंडळात संधी देतील, अशी दबक्या आवाजात चर्चा होती. पण तसं काही घडताना दिसत नाहीय. ( पुणे : मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, भिडे पूलही पाण्याखाली जाण्याची भीती ) महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना अचानक सत्तांतर होईल, अशी कल्पनाही कुणी केली नसेल. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या पक्षाविरोधात मोठी बंडखोरी केली. त्यांना 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात नवं सरकार स्थापन झालं. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी राज्यात केलेलं काम न विसरण्यासारखंच आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या बीडमध्ये भाजपसाठी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे पंकजा या 2014 ते 2019 या युती सरकारच्या काळात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री होत्या. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पंकजा यांच्या विरोधात एकामागे एक अनपेक्षित घटना घडताना दिसत आहेत. पंकजा मुंडे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांचे चुलत भाऊ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर मुंडे यांना भाजपकडून विधान परिषदेवर पुन्हा संधी देण्यात येईल, अशी चर्चा होती. पण या गोष्टी फक्त चर्चेपुरताच मर्यादित राहिल्या. विशेष म्हणजे पंकजा मुंडे या दरम्यानच्या काळात राज्यातील पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सातत्याने सुरु असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना त्यांनी एका कार्यक्रमात आपली नाराजी उघडपणे मांडली होती. त्यांच्यासोबत त्याच मंचावर पंकजादेखील होत्या. त्यानंतर खडसेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पण पंकजा या पक्षातील अंतर्गत मतभेद दूर सारुन पक्षासाठी काम करत राहिल्या. पुढे काही महिन्यांनी विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या. त्यावेळी पंकजा यांना भाजपकडून विधान परिषदेसाठी संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण भाजपकडून पंकजा यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर दीड महिन्यापूर्वी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीतही पंकजा यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण त्या चर्चा फक्त चर्चाच राहिल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात