बीड, 27 मे : निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या (MLA Election) 10 जागांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात 20 जूनला 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षाकडून संधी मिळते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यादरम्यान पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे यांनी 'टीव्ही 9 मराठी' वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. 'मी विधान परिषदेत जावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे', असं म्हणत पंकजांनी आपल्या 'मन की बात' बोलून दाखवली आहे.
"मी विधान परिषदेत जावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत माझी अशी कुणाशी चर्चा नाही. प्रत्येकवेळी निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा होते. आता हा पायंडा पडलेला आहे. पण माझी अशी कुणाशीही चर्चा झालेली नाही. अनेक नावं येत आहेत. माझ्या एकटीचं नाव पुढे येत नाहीय. अनेक जागा आहेत. पक्ष जो निर्णय घेईल ते निर्णय झाल्यावरच कळेल", अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.
(प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसलेंना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश, कोर्टाचा मोठा निर्णय)
दरम्यान, पंकजा यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर देखील प्रतिक्रिया दिली. "महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण बघताना तणावपूर्वक वाटतं. टीव्ही लावला की तणाव वाढतो. कधीकधी मनोरंजक कार्यक्रमही बघायला मिळतात. काही कमेंट्स असतात. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाच्या गंभीरतेपासून दूर जातोय, असं कधीकधी वाटतं. मी राजकारण जवळून पाहिलं आहे. माझा जुना अनुभव पाहता आताचं राजकारण तणावपूर्व बनलं आहे. प्रत्येक व्यक्तीला खुलेपणाने व्यक्त होण्यासाठी अडचणीचं वाटतंय", असं पंकजा म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही प्रतिक्रिया दिली. "मध्य प्रदेशने जे केलं ते या सरकारला जमलं नाही कारण राज्य सरकारने त्या पद्धतीने केलं नाही. त्यांना आम्ही वेळोवेळी सांगत होतो. इम्पेरिकल डेटाचा विषय वेगळा आहे. त्यांनी आता लवकरात लवकर करु असं सांगितलं, त्यांनी ते करावं. ओबीसी आरक्षण वगळता निवडणुका होऊच नये हाच माझा आग्रह आहे. तसं झालं तर फार कठीण होईल. पक्ष आपापल्या पद्धतीने निर्णय घेतील. पण मागासवर्ग समाजाला संधी देण्याती आवश्यकता आहे", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
'या' आमदारांचा कार्यकाळ संपला, कुणाला संधी मिळणार?
राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्याही निवडणुका होणार आहे. एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परीषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. यामध्ये रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. त्यामुळे या जागी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुणा कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
भाजपकडून प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे यांना उमेदवारी दिली होती. सदाभाऊ खोत आणि प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर या ना त्या मुद्यावरून जोरदार हल्लाबोल करत आहे. सदाभाऊ खोत यांनी अनेक आंदोलनातून कायम चर्चेत राहिले आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना पुन्हा संधी मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
तर राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहे. सध्या ते विद्यमान सभापती आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल. तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडे सदस्य संख्या पाहता नवीन रणनीती आखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधान परिषदेची निवडणुकीसाठी विधान परिषदेचे सदस्य मतदान करत असतात. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 27 मतांची गरज असते. भाजपकडे मित्रपक्ष मिळून 113 जागा आहे. त्यामुळे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.तर महाविकास आघाडी पक्षाकडून कोणत्या नेत्याला संधी मिळणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pankaja munde