बीड, 28 नोव्हेंबर : शेतकरी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करू लागले आहेत. योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं आधुनिक शेतीतून चांगला नफा देखील होत आहे. आधुनिकतेची कास धरत बीड येथील शेतकरी मुरली काळे यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीकडे आपला मोर्चा वळवला. मुरली यांना या शेतीतून कमी वेळेत लाखोंचे उत्पन्न हाती पडू लागले आहे.
धारूर तालुक्यातील आडस गावातील शेतकरी पिढ्यान पिढ्या पारंपारिक शेती करतात. मात्र, या शेतीतून म्हणावे तेवढे उत्पन्न मिळत नव्हते. पिकांसाठी केलेला खर्चही कधी मिळत नसे. त्यामुळे येथील शेतकरी पारंपारिक शेतीला बगल देऊ लागले आहेत. आधुनिक शेतीतून चांगले उत्पन्न मिळवून आदर्श शेतकरी ठरत आहेत. मुरली काळे या शेतकऱ्यानं 1 एकर 30 गुंठे क्षेत्रावर रेशीम शेतीला सुरुवात केली. यातून आता वर्षाकाठी आठ लाख रुपयाचाचे उत्पन्न मिळू लागले आहे.
व्हॉट अॅन आयडिया सरजी... पुणेकर तरुण करतोय कंटेनरमध्ये केशरची शेती! पाहा Video
पारंपारिक शेती परवडत नव्हती
मुरली हे पूर्वी पारंपारिक पद्धतीने शेती करत होते. शेतीमध्ये कापूस, सोयाबीन या पिकांची लागवड केली जायची. मात्र यातून चांगले उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे मुरली यांनी 2012 मध्ये तुती लागवड केली. सुरुवातीच्या काळात काही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, अडचणींवर मात करत योग्य नियोजनातून जम बसवला. आज घडीला मुरली यांना रेशीम शेतीतून चांगला नफा मिळत आहे.
‘ठिणगी पडताच होत्याच नव्हतं होईल’, धोकादायक तारांमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
महिन्याकाठी 80 हजार रुपये उत्पन्न
दीड एकरमध्ये तुतीची लागवड केलेली आहे. एका वर्षात 10 बॅच घेतल्या जातात. प्रत्येक बॅचमध्ये साधारणता दीड क्विंटल कोशाचे उत्पादन होते. आणि यातून महिन्याकाठी 80 हजार रुपये उत्पन्न मिळते. आणि वर्षाला 8 लाख रुपये आर्थिक उत्पन्न हाती पडते. यात मशागतीसाठी एक ते सव्वा लाख रुपयांचा खर्च येतो.
आधुनिक शेती करावी, अशी माझी इच्छा होती. पारंपारिक शेतीमध्ये निसर्गाने दिलेल्या तडीमुळे माझे अनेकदा प्रचंड नुकसान झाले. रेशीम शेतीला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. मात्र, त्याला सामोरे गेलो. आता कमी खर्चात लाखो रुपयांचे उत्पन्न हाती येऊ लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.