बीड, 30 जुलै : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने निर्बंधही हटवले आहेत. यामुळे कोरोना काळात प्रलंबित असलेल्या रुग्णालयातील शस्त्रक्रिया, रुग्णांची संख्या यात वाढ झाली आहे. त्या तुलनेत रक्ताचा (Blood) साठा उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आपण रक्तदान केल्याने कुणाचे तरी आयुष्य वाढणार आहे. लोकांनी पुढाकार घेत रक्तदान करण्याचे आवाहन रुग्णालयाने केले आहे.
कोरोनाचा उद्रेक रोखण्यात यश आल्यानंतर आता कोरोना काळात थांबवलेल्या लहान-मोठ्या शस्त्रक्रिया रोज होत आहेत. यामुळे रक्ताची मागणी वाढली आहे. लोकांनी पुढाकार घेत रक्तदान करणे गरजेचे आहे. एरवी वर्षभर रक्तदानासाठी मोठमोठी शिबिरे घेतली जात. मात्र, या वर्षी शिबिरे कमी झाल्याने आणि कोरोनामुळे नागरिकांचा रक्तदानासाठी प्रतिसाद कमी मिळत असल्याने रक्त तुटवडा निर्माण होत आहे. मागील 6 दिवसापासून रक्तपेढीत रक्ताचा पुरवठाच झाला नाही. रक्ताचा पुरवठा सुरळीत असताना बीड जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमधून दिवसाला 30 ते 40 रक्ताच्या बॅग रुग्णांना दिल्या जातात. सर्वात जास्त रक्तांची गरज ही स्त्री विभागातील रुग्णांना यासह थॅलेसिमिया, अपघात या रुग्णांना असते.
हेही वाचा- रेल्वे स्थानकांवर सुरू झाली 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्कीम', पाहा काय होणार तुमचा फायदा, VIDEO
रक्तदात्याने पुढे येऊन रक्तदान करावे
बीड जिल्हा रुग्णालयात सध्या A+ 7,A 2, B+ 6, B 0, O+ 8, O 2, AB+ 9 एवढा रक्तांचा साठा शिल्लक आहे. हा साठा आवश्यकतेपेक्षा कमी आहे. सध्या बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांची आवक वाढली असून रक्ताचा होणारा पुरवठा बघता रक्तदानाचे कॅम्प आयोजित केले जात नाहीत. मागील दोन वर्षापासून कोरोनाची साथ असल्यामुळे अनेक रुग्णांचे ऑपरेशनचे प्लॅन हे रद्द झाले होते. मात्र आता कोरोनाची लाट ओसरली असून ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया बाकी राहिली होती त्यादेखील पार पडू लागल्या आहेत. त्यामुळे रक्ताची मागणी वाढली आहे. सामाजिक संस्था व रक्तदात्याने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे यांनी केले आहे.
जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा पुरवठा होत नसल्यामुळे गरीब रुग्णांना बाहेरून रक्त पिशवी विकत घेणे अशक्य होत आहे. रक्तदानासाठी नागरिकांनी, सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. दिपाली कट्टेबी यांनी केले आहे.
हेही वाचा- बसस्थानकाला खड्डे, कचरा अन् दुर्गंधीचा विळखा; प्रवाशांचे आरोग्य धोक्यात, पाहा VIDEO
नातेवाईक रुग्णालयामध्ये दाखल आहेत. ए पॉझिटिव्ह रक्ताची गरज आहे. पण याठिकाणी रक्त तुटवडा असल्याने रक्त मिळू शकले नाही. असे हनुमान मुळीक यांनी सांगितले.
रक्तदानासाठी पत्ता
नागरिकांना जर स्वेच्छेनं रक्तदान करायचे असेल तर जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान करू करता येते. रक्तदानासाठी काही नियमावली आहे त्या नियमानुसार तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला रक्तदान करता येते. रक्तदानासाठी जिल्हा रुग्णालयाच्या रक्त पेढीशी देखील संपर्क साधता येईल. त्यासाठी रुग्णालयाचा पत्ता- पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूस बार्शी रोड जिल्हा रुग्णालय संपर्क क्रमांक 9577770977.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Beed news, Blood bank, Blood donation, Maharashtra News