रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 21 फेब्रुवारी: आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. बोर्ड परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. त्यासाठी परीक्षा केंद्राच्या जवळ असणाऱ्या झेरॉक्स सेंटरचा वापर होतो. आता परीक्षा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून बीड जिल्ह्यातील परीक्षा काळात केंद्राजवळील सर्व झेरॉक्स सेंटर बंद राहणार आहेत. बीडमध्ये 38 हजार 929 विद्यार्थी देणार परीक्षा बीड जिल्ह्यामध्ये 101 केंद्रावर 38 हजार 929 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र बीड जिल्ह्यात देखील अनेक परीक्षा केंद्रे ही संवेदनशील आहेत. त्या ठिकाणी कॉपी सारखे गैरप्रकार होण्याची शक्यता असते. त्या परिसरात असणाऱ्या झेरॉक्स सेंटरमुळे कॉपी करण्याचे प्रमाण अधिकच वाढते.
झेरॉक्स सेंटर बंद परीक्षेत गैरप्रकार होताना बऱ्याचदा परीक्षा केंद्रजवळ असणाऱ्या झेरॉक्स सेंटरचा वापर होतो. अनेकदा पुस्तक, नोट्स यांच्या मायक्रो झेरॉक्स तयार केल्या जातात. अनेक विद्यार्थी ते परीक्षेच्या ठिकाणी घेऊन जातात. या झेरॉक्सची साईज छोटी असल्यामुळे तपासणीमध्ये देखील ते सापडत नाही. त्यामुळेच असे गैरप्रकार घडू नयेत यासाठी बीडमधील माध्यमिक शिक्षण विभागाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सर्व केंद्राजवळ असणारी झेरॉक्स सेंटर परीक्षा काळात बंद ठेवावी लागणार आहेत. Beed News: ZP शाळेच्या पोरांना लयभारी संधी, इस्रो आणि नासची करणार वारी! भरारी पथकाचे राहणार लक्ष. परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्याची पूर्ण तयारी परीक्षा विभागाने केली आहे. कॉपी टाळण्यासाठी भरारी पथके, बैठे पथक असणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात विद्यार्थ्यांची झडती देखील घेण्यात येणार आहे.