बीड, 24 ऑक्टोबर : दिवाळी सणात झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. पूजेसह घराला तोरण बांधणे, सजावट करणे, वाहनांना हार घालण्यासाठी फुलांचा उपयोग होतो. दिवाळीत यामुळेच फुलांना मोठी मागणी असते. मात्र, यंदा मागणी असून देखील आवक वाढल्याने फुलांना कवडीमोल भाव मिळत आहे. यामुळे फूल उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
दिवाळीत सजावटीसाठी तसेच पुजेसाठी झेंडू फुलांची मागणी वाढते. मात्र, जिल्ह्यातील फूल लागवडीचे क्षेत्र वाढले आणि झालेला मुबलक पावसाने फुलांचे उत्पन्न वाढले आहे. परिणामी बाजारात फुलांची आवक वाढली असल्याने फुलांचे भाव पडले आहेत. दिवाळीत फुलांपासून चांगले उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती मात्र, सध्या बाजारात केवळ 30 ते 40 रुपये किलोप्रमाणे फुलांची विक्री होत आहे.
फुलाचे उत्पादन वाढले
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात जलसिंचनाखाली अधिक क्षेत्र आहे. तालुक्यातील खानापूर, केसापुरी, फुले, पिंपळगाव, छोटेवाडी, मोठेवाडी, या गावांमध्ये झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. यामुळे बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये प्रति किलो 80 रुपये किलो मिळणारा भाव यंदा 30 ते 40 रुपयांवर आला आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
Video : शेतकऱ्यांनी मिटवला चाऱ्याचा प्रश्न, ‘या’ पद्धतीनं केली वर्षभराची साठवणूक
भावच नसल्याने शेतकरी निराश
माजलगाव तालुक्यातील शेतकरी उद्धव खेत्रे यांनी गेल्या वर्षी 10 गुंठ्यांमध्ये 1500 झेंडूच्या फुलांच्या झाडाची लागवड केली होती. त्यासाठी 15 हजार रुपये खर्च झाला. यामधून त्यांना 2 टन फुलांचे उत्पन्न मिळाले. यातून खेत्रे यांना 70 हजार नफा मिळाला होता. यंदा 1 एकर क्षेत्रावर पाच हजार झाडांची लागवड केली. 40 हजार रुपये खर्च केला. 4 टन उत्पन्न मिळाले. मात्र, भावच नसल्याने लागवडीचा खर्चही निघत नसल्याची स्थिती खेत्रे यांची आहे. खेत्रे साखरे अनेक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होत्या मात्र यंदा भाव नसल्याने फूल उत्पादक शेतकरी निराश आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.