सातारा, 24 ऑक्टोबर : ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळला आहे. परंतु, खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागत नसल्याचे शेतकरी निराश होतात. मात्र, खर्च कमी करून उत्पन्न वाढीवर भर दिला तर व्यवसाय फायद्याचा होऊ शकतो. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रयोगशील शेतकऱ्यांचा मुरघास बनवण्याकडे कल अधिक वाढला आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे
दुग्धव्यवसायासाठी दुभत्या गाईंना पौष्टिक आहार पुरवणे फार गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चित प्रमाणामुळे चारा टंचाई तसेच पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्यांची उभारणी होते. परंतु अशा परिस्थिती कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी चारा सहा महिने ते 1 वर्षापर्यंत मुरघास पद्धतीने साठविणे फायद्याचे ठरू शकते.
Satara : शिक्षकानं करुन दाखवलं, मजूर, मेंढपाळांच्या मुलांना मिळतंय ग्लोबल शिक्षण! Video
दुष्काळी भागातील शेतकरी वर्षभर पौष्टिक हिरवा चारा जनावरांना उपलब्ध करून देऊ शकत नाही. पावसाळ्यात मुबलक चारा असतो मात्र, उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई असते. अशा परिस्थितीत मुरघास बनवून दीर्घ काळ साठवणे फायद्याचे असते. मुरघास बनवण्याची प्रक्रिया कमी खर्चीक आहे. हा चारा शेतकरी वर्षभर वापरू शकतात.
या पिकांपासून बनतो मुरघास
हिरवा चारा पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश न होऊ देणे. यासाठी किमान 45 दिवस चारा हवाबंद करून ठेवणे. या प्रक्रियेला मुरघास असे म्हणतात. मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, व काही गवती चारा पिके वापरली जातात. यामध्ये मका या पिकाचा सर्वात जास्त वापर केला जातो. मक्याचा मुरघास अतिशय चांगला होतो. मुरघासासाठी चिकातील मका व फुलोऱ्यातील ज्वारीचा वापर हमखास केला जातो.
मुरघासाचे फायदे
मुरघासामुळे वर्षभराच्या हिरव्या चाऱ्याचे नियोजन पावसाळ्यातच होते. उन्हाळ्यातही जनावरांना हिरवा आणि पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्याची कमाल साधता येते. रोज शेतात जाऊन वैरण कापून आणण्याचे कष्ट वाचतात. वर्षभर चांगल्या प्रतीचा एकसारखा चारा मिळत राहिल्याने जनावरांमधील पोटाचे आजार कमी होऊन आरोग्य वाढते. कमीत कमी जमीन असणारा शेतकरीसुद्धा मुरघास केल्यावर जास्त गाईंचा आरामशीर सांभाळ करू शकतो. मुरघासामुळे हिरव्या चाऱ्याची गुणवत्ता सुधारते. खुराकामध्ये काही प्रमाणात बचत होते. जनावरे मुरघास आवडीने खातात. त्यामुळे वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. दूध उत्पादनात वाढ होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Satara, Satara news, शेतकरी, सातारा