बीड, 3 जुलै : बीड जिल्ह्यामध्ये पोलीस आणि वकील यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. महिला अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये पोलीस आरोपीला अमुक वकिलाकडे जा अशी शिफारस करत आहेत. यात पोलीस आणि वकील यांचे आर्थिक हितसंबंध आहेत, असा आरोप बीडच्या तब्बल 200 वकिलांनी केला आहे. त्या संदर्भात थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पोलीस अधिकारी आणि वकील यांच्यातील भागीदारी विषयी गंभीर आरोप करण्यात आला आहे. यात अत्याचार प्रकरणात काम करणाऱ्या पिंक मोबाईल पथकाच्या पोलीस निरीक्षक मिना तुपे यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात ही तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून बीडमध्ये नेमकं काय सूरूय? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. तर पोलिसांनी वकील सामान्य लोकांची लूट करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. मी सांगेल त्याच वकीलाकडे काम द्या. मी सांगितलेल्या वकिलांना काम दिले नाही तर तुम्हाला प्रकरणात शिक्षा येईल किंवा तुमचा जामीन अर्ज नामंजुर होईल, यासह मी तुम्हाला तपासात सहकार्य करणार नाही. आरोपींचा जामीन होऊ देणार नाही, अशा प्रकारचा दबाव पोलीस उपनिरीक्षक मिना तुपे आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांवर टाकत असल्याचा आरोप वकीलांनी केला आहे. यामुळे कायद्याची पायमल्ली होत आहे. हे थांबवा, अशी मागणी वकिलांनी केली आहे. ( शिंदे-फडणवीसांच्या निर्णयाने ठाकरेंचं वाढलं टेन्शन, ‘मातोश्री’वर खलबतं, पुढचा मार्ग काय? ) अपघातांच्या प्रकरणातही पोलीसच मर्जीतील वकिलांची नावे सुचवतात. कित्येक अपघातांच्या प्रकरणामध्ये दावे न्यायालयात दाखल केले जातात. अशा प्रकरणात पोलीस अधिकारी व तपासी अधिकारी अर्थाजनासाठी त्यांच्या मर्जीतील विशिष्ट वकीलांचीच नावे सुचवतात. म्हणजे त्यांना त्याच वकीलांकडे काम द्यावे म्हणून आग्रह करतात, दबाव टाकतात. विशेष म्हणजे सदर कर्मचारी तपासी अंमलदार हे त्या प्रकरणात वकिलांसोबत भागिदारी करतात. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याने वकीली पेशाचे नुकसान होत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. वकील संघाच्या 200 वकिलांनी दिलेल्या तक्रारी अर्ज संदर्भात आणि निवेदना संदर्भात बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना विचारले असता हा खूप छोटा विषय आहे. यासंदर्भात काय प्रतिक्रिया द्यायची असे म्हणत बोलण्यास नकार दिला. या संदर्भात आरोप आलेल्या पोलीस निरीक्षक मनिषा तुपे यांना विचारले असता या संदर्भात मला या प्रकरणात काहीच बोलायचं नाही, असे म्हणून त्यांनी बोलणे टाळले. एकीकडे महिलांवरील अत्याचार, खून, चोरी, दरोडे, मारामाऱ्याचे प्रकार वाढत असताना दुसरीकडे कायद्याचे रक्षक म्हणून घेणारे वकील आणि पोलीस एकमेकांत भांडून स्वतःची तिजोरी भरण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नेमकं सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे पोलीस आणि वकील भागीदारीने सर्वसामान्यांची लूट करत आहेत का? हा देखील खरा प्रश्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.