परळी, 13 फेब्रुवारी : धनंजय मुंडेंनी दिल्ली गाठण्याची तयारी सुरू केली आहे. परळीत धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजच्या बॅनरवर संसदेचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे धनंजय मुंडे गल्लीतून दिल्लीत जाण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्टे संकेत मिळत आहेत. तर बीड जिल्ह्यावर आमचाच झेंडा कायम राहिल, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय. स्टेजवरील भल्या मोठ्या बॅनरवरील संसदेचा छापलेला फोटो धनंजय मुंडेंची आगामी वाटचाल कोणत्या दिशेनं होणार आहे? हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. अपघातानंतर 40 दिवसांनी धनंजय मुंडे परळीत आल्यानं कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात मिरवणूक काढून धनंजय मुंडेंचं स्वागत केलं. यावेळी स्वागताला उत्तर देताना धनंजय मुंडेंनी, परळीला विचारल्याशिवाय येत्या काळात राजकारणातील राजकीय घडामोडी घडू शकत नाहीत, असं वक्तव्य करून आगामी लोकसभा निवडणुकीचं सुतोवाचच केलं. देशातील 100 विकसित मतदार संघात अल्याशिव स्वस्थ बसणार नाही, असं धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात म्हणाले. मागील दोन वर्षात धनंजय मुंडेंवर अनेक संकट कोसळली. यावेळी शेरोशायरीच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी विरोधकांना उत्तर दिलं. ‘कुच लोग मेरे बारेमे बोल रहे है, मैने कभी पिठे पीचेसे वार नहीं किये.. लढेंगे तो सामने..वक्त ने थोडासा साथ नही दिया तो लोगोने मेरी काबिलियत पर शक कर दिया,’ अशी शायरी धनंजय मुंडे यांनी केली. बीड लोकसभा मतदारसंघात सध्या प्रितम मुंडे खासदार आहेत. मात्र आता त्यांच्याच मतदारसंघात धनंजय मुंडे पाऊल ठेवणार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यातील मतदार थारा देणार नाहीत, अशी टीका भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. लोकसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. मात्र धनंजय मुंडेंनी आता पासूनच शड्डू ठोकल्यानं बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापणार यात शंकाच नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.