मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed : मुलींवर वाईट नजर टाकाल तर…; दंडुका घेऊन दामिनी पथक सज्ज, VIDEO

Beed : मुलींवर वाईट नजर टाकाल तर…; दंडुका घेऊन दामिनी पथक सज्ज, VIDEO

रोड रोमिओ आणि टवाळखोरांचा समाचार दामिनी पथक घेणार आहे. छेडछाडीचा प्रकार घडल्याची माहिती समजताच तसेच शहरात गस्त घालून हे पथक टवाळखोरांना धडा शिकवणार आहे.

बीड, 19 ऑगस्ट : शाळा, महाविद्यालय परिसरात रोड रोमिओ मुलींना टार्गेट करतात. शाळेच्या आवारात, गेटसमोर उभे राहून मुलींवर वाईट नजर टाकणे, छेड काढणे, कमेंट पास केल्या जातात. यातून मुलींना त्रास सहन करावा लागतो. मात्र, आता अशा रोड रोमिओ आणि टवाळखोरांचा समाचार दामिनी पथक (Damini squad) उपरोक्त ठिकाणी धडक मारून घेणार आहे.  छेडछाडीचा प्रकार घडल्याची माहिती समजताच तसेच शहरात गस्त घालून हे पथक टवाळखोरांना धडा शिकवणार असून  मुलींवर वाईट नजर ठेवली, तर दंडुकांचा मार पडणार आहे.  शाळा, महाविद्यालय वा तत्सम सार्वजनिक ठिकाणी युवती व महिलांना त्रास देण्यासाठी टवाळखोरांची कमी नसते. असे टवाळखोर मुलींची छेड काढणे, कमेंट पास करून मुलींना परेशान करतात. जिल्ह्यात अशा प्रकारात वाढ झाली असून याची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दामिनी पथकाची स्थापना केली आहे. दामिनी पथक शाळा महाविद्यालय परिसरात गस्त घालून टवाळखोरांच्या मुसक्या आवळत आहे. सकाळी सात वाजल्यापासून गस्त शहरातील बलभीम कॉलेज, के एस के, यासह संस्कार विद्यालय, चंपावती आणि उमाकिरण परिसरात विद्यार्थ्यांची रेलचेल असते. याच परिसरात टवाळखोर आणि रोड रोमिओ दिसून येतात. यासाठीच हे दामिनी पथक सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत परिसरात गस्त घालत आहे. यामुळे मुलींची छेडछाड होण्याचे प्रमाण कमी झाले. जिल्ह्यात 12 पथक  दामिनी पथकामध्ये एकूण 4 अंमलदार असून 1 महिला अधिकारी देखील कार्यरत आहे. संपूर्ण जिल्ह्यात 12 पथक महाविद्यालय परिसरात देखरेख ठेवतात. 112 या क्रमांकावर संपर्क केल्यावर हे पथक उपरोक्त परिसरातील भागांमध्ये पोहोचते. दोन महिन्यात वीस तक्रारी जिल्हास्तरीय छेडछाड विरोधी पथकाकडे आलेल्या आहेत. त्यानुसार संबंधित ठिकाणी पथकाने जाऊन टवाळखोरांना वठणीवर आणले आहे. हेही वाचा- ऐतिहासिक वारसा आणि दारूगोळ्याचे भंडार असलेला परांडा किल्ला 43 रोमिओंच्या आवळल्या मुसक्या  मुलींची छेड काढणाऱ्या 43 रोड रोडरोमिओंना दामिनी पथकाने पोलीस खाक्या दाखवून चांगली अद्दल घडवली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून काही जणांवर खटले, काहींवर फौजदारी कारवाई केली तर अनेकांना समज देण्यात आली आहे. दामिनी पथकाने शहरातील गजबजलेल्या सर्वच ठिकाणी इंगा दाखवला असून मुलींची छेड काढणाऱ्यांची कुठल्याच परिस्थितीत गय केली जात नाही. छोटीशी तक्रार देखील संवेदनशील या पथकाकडून हाताळले जात आहे.   मदत लागल्यास त्वरित संपर्क करावा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दामिनी पथकाचे कामकाज, मदत, याविषयी शाळा, कॉलेजात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आलेली आहे. या पथकाचा नंबर देखील शेअर करण्यात आला असून मदत लागल्यास त्वरित संपर्क करण्यात आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे या पथकाचा फायदा विद्यार्थिनींना होत आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी एक महिन्यापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे पथक कार्यरत केले आहे. त्यामुळे महिलांना या पथकाचा निश्चितच फायदा होईल, अशी खात्री उपविभागीय पोलीस अधिकारी, संतोष वाळके व्यक्त केली. हेही वाचा- नर मादी धबधबे बहरले; नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दामिनी पथकाकडे जिल्हास्तर आणि तालुका स्तरावरून कॉल येतात. त्या परिसरात हे पथक तत्काळ पोहोचते. याशिवाय जिल्ह्यातील व त्या त्या परिसरातील पोलीस स्टेशनचेही पथक स्वयंस्फूर्तीने कॉलेज, शाळा परिसरात गस्त घालते, अशी माहिती छेडछाड विरोधी पथकाचे प्रमुख सुरेखा धस यांनी दिली. अकरावी वर्गात मी शिकत आहे. कॉलेज परिसरामधून जात असताना अनेक टवाळकी करणारी मुले दिसतात. मात्र, आता दामिनी पथकामुळे आम्हाला सुरक्षितता जाणवते, अशी माहिती विद्यार्थिनी दिली.
First published:

Tags: Beed, Beed news, पोलीस, बीड

पुढील बातम्या