जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विष प्राशन केलं, नंतर दादाला फोन, बीडमध्ये विवाहितेने संपवलं आयुष्य, कारण...

विष प्राशन केलं, नंतर दादाला फोन, बीडमध्ये विवाहितेने संपवलं आयुष्य, कारण...

बीडमध्ये महिलेची आत्महत्या

बीडमध्ये महिलेची आत्महत्या

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि वाईट बातमी समोर आली आहे. हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळास कंटाळून एका विवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

बीड, 4 सप्टेंबर : देशात हुंडा ही विचित्र आणि वाईट परंपरा बंद झाल्याचं मानलं जातं. पण हुंडा परंपरा अजूनही पूर्णपणे बंद झालेली नाही. देशातील काही भागांमध्ये अजूनही हुंड्यासाठी मुलींना आणि मुलीच्या कुटुंबियांना मानसिक आणि शारीरिकरित्या छळलं जात आहे. काही ठिकाणी विवाहित तरुणींच्या पाठीमागे हुंड्यासाठी तगादा लावला जातो. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी केला जाणाऱ्या छळामुळे काही तरुणी आत्महत्या करुन टोकाचा निर्णय घेतल्याचं याआधीदेखील समोर आलं आहे. बीडमध्ये अशीच काहीशी घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि वाईट बातमी समोर आली आहे. हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळास कंटाळून एका विवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. बीड तालुक्यातील बेलवाडी येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा हुंड्याची गंभीर समस्या पुढे आलीय. कविता ज्योतीराम यादव असे मृतक 24 वर्षीय विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पिंपळेनर ठाण्यात पतीसह चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Video : चेंदा-मेंदा झालेली कार, रस्त्यावर सायरस मिस्त्रींचा मृतदेह; पोलिसांनी सांगितलं अपघातामागील नेमकं सत्य ) कविताचा विवाह 2017 मध्ये बेलवाडी येथील ज्योतीराम श्रीमंत यादव सोबत झाला होता. विवाहानंतर त्यांना एक मुलगा झाला. सासरच्यांनी सुरुवातीला वर्षभर कविताला चांगले नांदवले. मात्र, नंतर तुला स्वयंपाक येत नाही. घरबांधण्यासाठी माहेरहून पाच लाख घेऊन ये, असे म्हणत तिचा मारहाण करून छळ सुरू केला. अखेर छळ असह्य झाल्याने तिने विष प्राशन केले. यानंतर तिने भाऊ रामेश्वरला फोन करून आता मला त्रास सहन होत नाहीय. मी विष घेतले आहे, असे सांगितले. आपल्या ताईने विष प्राशन केल्याची माहिती मिळाल्यानंतर रामेश्वर यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने फोनद्वारे कविताला रुग्णालयात दाखल करण्यासाठी ओळखीच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. धावपळ करत कविताला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान कविताचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मृतक कविताच्या माहेरच्या मंडळींनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत कविताचा पती ज्योतीराम, सासू सिंधू , सासरा श्रीमंत, दीर संतोष यादव यांच्यावर पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात