बीड, 17 मार्च : राज्यभरात सध्या होळीचा (Holi 2022) उत्साह आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) कोरोनाचा (Corona) संसर्ग आणि दहावी-बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर होळी साजरी करण्याबाबतच्या काही नियमावली जारी केल्या आहेत. होळी आणि धुलीवंदन हा सण अनेकांचा आवडता सण असतो. या सणाच्या अनेकांच्या अनेक आठवणी असतात. होळीचा हा उत्साह सर्वत्र ताजा असताना बीडच्या एका गावात धुळवडीची अनोखी परंपरा जपली जात आहे. या गावात धुलिवंदनाच्या दिवशी चक्क गावच्या एखाद्या जावयाला गाढवावर बसवून त्याची मिरवणूक काढली जाते. विशेष म्हणजे गाढवावर बसणाऱ्या जावयाच्या गळ्यात त्यावेळी चपलांता हारदेखील घातला जातो. हीच परंपरा यावर्षीदेखील गावकरी जपणार आहेत. पण त्यांना त्यासाठी गाढव आणि जावई दोन्ही मिळेना झाले आहेत. बीडच्या विडा गावातील धुलीवंदनाची जावयाला गाढवावरून चपलांचा हार घालून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा आहे. मात्र यंदा जावयाच्या शोधा बरोबरच आता गाढवाचाही शोध गावकऱ्यांना घ्यावा लागत आहे. मात्र तरीही काहीही करू पण गाढवाचा आणि जावयाचा शोध घेऊन धुलीवंदनाचा उत्सव थाटात साजरा करू म्हणत, गावकऱ्यांनी गाढवासह जावई शोध सुरू केला आहे. ( VIDEO : अरुंधती होळी साजरी करणार आशुतोषसोबत, रंगणार सुरांची मैफिल ) केज तालुक्यातील विडा येथे मागील 10 दशकांपासून धुळवडीच्या दिवशी जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा आहे. मात्र मागील 2 वर्षांपासून ही परंपरा कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली होती. परिसरातील जावई व घरजावई यांना सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र कोरोना आटोक्यात आल्यानंतर पुन्हा सर्वच कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्यात पुन्हा जावई पसार होण्यास सुरुवात झाली आहे. उद्या हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता होणार आहे. या गावात मोठ्या प्रमाणात गाढवांची संख्या होती. पण आता गावात क्वचित गाढव बाघायला मिळतं. त्यामुळे आता जावयासोबत गाढवाचा देखील शोध घ्यावा लागतो. मात्र परंपरा टिकवण्यासाठी गावातील प्रत्येक जण गाढवाचाही शोध घेत आहेत आणि जावयाचा शोध घेत आहेत, असं गावकऱ्यांनी सांगितले. कोविडच्या 2 वर्षानंतर आता गाढवावरून मिरवणूक काढण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे विडेकरांना आता जावाई आणि गाढव शोधात यश मिळणार का? आणि धुलिवंदनाची 90 वर्षांपासून चालत आलेली परंपरा, अखंडित राहणार का? हेचं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.