जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी, थोरातांच्या जागी नवा नेता! राष्ट्रवादी नाराज होणार?

काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी, थोरातांच्या जागी नवा नेता! राष्ट्रवादी नाराज होणार?

काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी, थोरातांच्या जागी नवा नेता! राष्ट्रवादी नाराज होणार?

सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणं कठीण झाल्याचं पत्र बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना लिहिलं आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन थोड्याच दिवसांमध्ये सुरू होणार आहे, त्यामुळे नवीन गटनेता ठरवण्यासाठी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. नव्या गटनेते पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी अनुकूल असल्याचं स्पष्ट होऊ लागलं आहे. विधिमंडळ गटनेते पदासाठी दिल्लीत झालेल्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर जोरदार चर्चा झाली. पृथ्वीराज चव्हाण आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची जवळीक पाहता, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे लोकप्रतिनिधी आणि पक्षात समन्वय पाहायला मिळेल, असं पक्षातल्या नेत्यांना वाटतं. पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. दिल्लीतल्या अनेक नेत्यांशी त्यांची चांगली मैत्री आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदावर काम केल्याचा अनुभव पृथ्वीराज चव्हाणांना आहे. सभागृह आणि कामकाज याची माहितीही त्यांना आहे. राष्ट्रवादी नाराज होणार? पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने गटनेता केलं तर राष्ट्रवादी नाराज होणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे गटनेते झाले तरी विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवारांकडे आहे, त्यामुळे राज्य सरकारला धारेवर धरण्यासाठी तसंच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या महाविकासआघाडीच्या पक्षांचा योग्य समन्वय ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेते आणि गटनेते यांच्यातलं को-ऑर्डिनेशन महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातलं नातं कायमच वादात राहिलं. काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आरोप केले होते. पृथ्वीराज चव्हाणांमुळे 2014 साली सरकार गेल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. पृथ्वीराज चव्हाण डायरेक्ट दिल्लीहून आल्याने त्यांना आमदारकीचाही अनुभव नव्हता. दुर्दैवाने काँग्रेस आणि आमच्यात दुरावा निर्माण झाला आणि पुढे फटका बसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फारसं सख्य नव्हतं. पृथ्वीराज चव्हाण जलद निर्णय घेत नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मोठी अडचण झाली होती, त्यामुळे शरद पवारांनी त्यावेळी कठोर शब्दात टीका केली होती. आताच्या लोकांना निर्णय घेताना हाताला लकवा भरतो काय? निर्णय वेळेत घेतले जात नाहीत, अशा शब्दात शरद पवारांनी टीका केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतच्या वादानंतर राष्ट्रवादीने 2014 विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी सरकारचा पाठिंबा काढून घेतला, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली होती. महाविकासआघाडी सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून पुढे आणण्यात आलं, पण त्याला राष्ट्रवादीने विरोध केल्याचंही बोललं गेलं. नाना-बाबा वाढवणार टेन्शन? एकीकडे पृथ्वीराज चव्हाण-राष्ट्रवादी यांच्यातले वाद सर्वश्रूत असतानाच तिकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांवर अनेकवेळा थेट टीका करतात, त्यामुळे विधिमंडळात गटनेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण आणि बाहेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले या दोघांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि महाविकासआघाडीमध्ये ‘ऑल इज वेल’ राहणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात