मुंबई, 23 जानेवारी : बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम विधानभवनात पार पडला. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी केलेल्या भाषणामुळे वाद निर्माण झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगत असताना नारायण राणे यांनी त्यांना मानसिक त्रास कुणी दिला, याबाबत बोलायला सुरूवात केली. नारायण राणे यांच्या या भाषणाला विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला. नारायण राणे यांचं भाषण औचित्यभंगाचं असल्याचा आक्षेप नीलम गोऱ्हे यांचा होता. नारायण राणे यांचं भाषण सुरू असताना छगन भुजबळ उठून बाहेर निघाले, तर राणेंनी त्यांना अडवलं. भुजबळांनी त्यांना हात दाखवला. तेव्हा भुजबळांनी मला समर्थन म्हणूनच हात दाखवला, असा दावा केला. नारायण राणे यांच्या भाषणात टीकेचा सूर उमटत असताना नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाषण थांबवायला सांगितलं, त्यावर नारायण राणेंनी पलटवार केला. मी बसून बोलणाऱ्यांचं ऐकत नसतो, असं राणे म्हणाले.
याच कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांनी बाळासाहेबांचं तैलचित्र आधी दाखवण्यात आलं नसल्याबद्दल आक्षेप नोंदवला. ‘राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन. ते सुद्धा एकेकाळी शिवसेनेत होते. त्यांनी अजूनही आम्हाला तैलचित्र दाखवलेलं नाहीय. पण हरकत नाही, वारीला जाणारा वारकरी विठ्ठलाचा झेंडा कोणाच्या हातात आहे हे पाहून दर्शनाला जात नाही तसे आम्ही सर्वकाही बाजूला ठेऊन इथे आलोय’, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली.