मुंबई, 14 जुलै : राज्यात (Maharashtra news) कोरोनाव्हायरचे नवे रुग्ण अजूनही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे कुठल्याही कारणासाठी गर्दी करणं परवडणारं नाही, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांनी बकरी ईद घरीच साजरी करा, असं आवाहन केलं आहे. Coronavirus च्या प्रादुर्भावामुळे यावर्षी वारकऱ्यांनीही चांगला निर्णय घेत वारीला जाणं टाळलं. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यानीही या वर्षी गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांनीही घरातच ईद साजरी करावी, असं ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बकरी ईद संदर्भात बैठक घेतली. अनेक लोकप्रतिनिधींनी ईद साजरी करण्यासाठी Lockdown च्या काळात मटण उपलब्ध कसं करून देणार याविषयी विचारणा केली होती. शक्य असेल तिथे ऑनलाईन मटण विक्रीस प्राधान्य द्यावं. मटण शॉप्स जिथे असतील तिथून किंवा ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर घेता येईल का याबाबत उपाय योजना करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ‘हा व्हायरस रोखायचा असेल तर गर्दी होऊ देताच कामा नये. मी मुल्ला मौलवींशी यासंदर्भात चर्चा करीन", असंही ठाकरे म्हणाले. “वारकऱ्यांनी साधेपणाने वारी साजरी केली. लालबागच्या राजाने यावर्षी प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. आता मुस्लीम बांधवांनीही पुढाकार घ्यावा. राज्याच्या आणि जिल्ह्याच्या सीमा बंद किंबहुना नियंत्रित प्रमाणात उघडल्या आहेत. जुलै अखेरीस कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले. या वेळी गर्दी रोखली नाही आणि कोरोनाची साखळी तोडली नाही तर ऑगस्टपासून हा आलेख आणखी वर जाईल. तो तसा गेला तर नियंत्रण कठीण होईल. कारण सर्व काम करणाऱ्या यंत्रणांवर ताण वाढत चालला आहे, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. “सण दरवर्षी येतात. 2020 हे वर्ष कॅलेंडर मधून काढून टाकू. पुढच्या वर्षीपासून आणखी जोशात सण साजरा करण्यासाठी चांगलं आरोग्य लाभू अशी प्रार्थना करू”, असं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







