बकरी ईद! प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाम विरोधी, काँग्रेस नेत्याचा सरकारला कडाडून विरोध

बकरी ईद! प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाम विरोधी, काँग्रेस नेत्याचा सरकारला कडाडून विरोध

प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाम विरोधी असल्याने उद्धव ठाकरे सरकारची ही मार्गदर्शक तत्वे स्वीकारत नसल्याचं नसीम खान यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जुलै: राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी करण्याबाबत राज्य सरकारनं नवी गाईडलाईन जाहीर केली आहे. मात्र, सरकारच्या गाईडलाईनला काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी कडाडून विरोध केला आहे.

हेही वाचा...'लोन देतो आमची कोरोना लस घ्या'; गरीब देशांना आपल्याकडे खेचण्यासाठी चीनचा डाव

काँग्रेस नेते नसीम खान यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. बकरी ईद साजरी कशी करावी, या संदर्भात राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांना नसीम खान यांनी विरोध दर्शवला आहे. प्रतिकात्मक बकऱ्याची कुर्बानी होऊ शकत नाही किंवा ऑनलाइन खरेदी होऊ शकत नाही. प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाम विरोधी असल्याने उद्धव ठाकरे सरकारची ही मार्गदर्शक तत्वे स्वीकारत नसल्याचं नसीम खान यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारनं तात्काळ बैठक घेऊन या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करावा, असंही नसीम खान यांनी पत्रात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, घरीच साजरी करा बकरी ईद...

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर कुठल्याही कारणासाठी गर्दी करणं आपल्याला परवडणारं नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मुस्लिम बांधवांनी बकरी ईद देखील घरीच साजरी करा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यंदा वारकऱ्यांनीही चांगला निर्णय घेत वारीला जाणं टाळलं. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यानीही या वर्षी गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनीही घरातच ईद साजरी करावी, असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.

काय आहेत राज्य सरकारच्या गाईडलाईन....

- बकरे खरेदी करा ऑनलाइन...

-बकरे खरेदी करण्यासाठी बाजार भरणार नाही...

- कुर्बानीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी करू नये...

- प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांनी आपल्या नावानं ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून कुर्बानी करून घ्यावी, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याबाबत काळजी घ्यावी...

-काही एनजीओंनी याबाबत पुढाकार घेतला आहे. मुंबईबाहेर कुर्बानी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- राहत्या घरीच बकरी ईदची नमाझ अदा करावी.

हेही वाचा...पुण्यात कोरोना साथीशी लढणारा आरोग्य विभागच बाधित, 3 अधिकारी पॉझिटिव्ह

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद संदर्भात गेल्या आठवड्यात बैठक घेतली होती. अनेक लोकप्रतिनिधींनी बकरी ईद साजरी करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात मटन उपलब्ध कसं करून देणार याविषयी विचारणा केली होती. शक्य असेल तिथे ऑनलाईन मटन विक्रीस प्राधान्य द्यावं. मटन शॉप्स जिथे असतील तिथून किंवा ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर घेता येईल का याबाबत उपाय योजना करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. 'हा व्हायरस रोखायचा असेल तर गर्दी होऊ देताच कामा नये. मी मुल्ला, मौलवींशी यासंदर्भात चर्चा करीन, असंही ठाकरे म्हणाले होते.

Published by: Sandip Parolekar
First published: July 24, 2020, 3:53 PM IST

ताज्या बातम्या