गणेश गायकवाड, प्रतिनिधी
ठाणे, 18 जानेवारी : बदलापूर पश्चिमेला कुलूप बंद अवस्थेत असलेल्या अग्निशमन केंद्राच्या दुरुस्तीसाठी तब्बल 1 कोटी 11 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदलापूर पालिकेचे अग्निशमन केंद्र असून 2011 साली उभारण्यात आलेले हे केंद्र 12 वर्ष झाले बंद अवस्थेत आहे. मग बंद असलेल्या अग्निशमन केंद्राचा वापरच झाला नसतांना बदलापूर पालिकेने एक कोटींचा खर्च ठेकेदाराला मालामाल करण्यासाठी केला का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांनी बदलापूर पालिकेला यासंदर्भात पत्र दिले असता त्यांना या केंद्राच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 11 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे पत्र बदलापूर पालिकेने दिले आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने या केंद्राची जागा आता रिक्षावाल्यांनी आपल्या रिक्षा पार्किंग करण्यासाठी ताब्यात घेतली आहे. तसेच या अग्निशमन केंद्रांच्या दुरुस्तीसाठी एव्हढा खर्च करून देखील त्याची दुरवस्था झाली आहे. दरवाजे तुटलेले असून एका खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार ठेवण्यात आलेले आहे. ही अवस्था पाहिल्यावर या केंद्रावर नक्की एक कोटी दुरुस्तीसाठी खर्च करणाऱ्या बदलापूर पालिकेने अग्निशमन केंद्राची काय दुरुस्ती केली, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
हेही वाचा - दिवसाढवळ्या फक्त 10-15 मिनिटांत चोरी करून फरार व्हायचे, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या
बदलापूरच्या पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदारांची आणि इथल्या राजकीय पुढाऱ्यांची खळगी भरण्यासाठी हा सगळा प्रकार केला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी देखील मागणी केली आहे. तर दुसरीकडे अपुऱ्या मनुष्यबळ अभावी हे केंद्र अजून सुरू झाले नसून हे केंद्र उभारल्यानंतर तिथे काही गोष्टी नव्याने बांधण्याची गरज होती. त्यासाठी हा खर्च झाल्याचे स्पष्टीकरण बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Badlapur, Fire station