'मातोश्री'बाहेरील शेतकऱ्याला भेट नाकारल्यानंतर बच्चू कडू यांचा सरकारला घरचा अहेर

'मातोश्री'बाहेरील शेतकऱ्याला भेट नाकारल्यानंतर बच्चू कडू यांचा सरकारला घरचा अहेर

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना भेटलं पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.

  • Share this:

संजय शेंडे, अमरावती, 5 जानेवारी : 'शेतकऱ्यांची अडवणूक करणे चुकीचे आहे. सामान्य नागरिक असो की शेतकरी मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतलीच पाहिजे,' असं म्हणत नवनिर्वाचित मंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे. 'प्रशासनाकडून झालेली चूक दुरुस्त करणे गरजेचे आहे. असा काळ आला तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसणार आहे,' असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर एक शेतकरी आपल्या मुलीसह आला होता. मात्र पोलिसांनी या शेतकऱ्यासोबत अरेरावी केली. याबाबत बोलताना बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना भेटलं पाहिजे, असं ते म्हणाले.

'खातं कुठलंही असो, मी त्याासाठी मागणी केली नव्हती. मात्र सामाजिक न्याय मिळालं असतं तर अपंग बांधवांना न्याय देता आला असता. सामाजिक न्याय खात्याची तशी मागणी कोण करत नाही. मात्र आम्ही ते मागितले होते, त्यामाध्यमातून अपंगांचे प्रश्न मार्गी लागले असते,' अशी प्रतिक्रिया खातेवाटपावर बोलताना बच्चू कडू यांनी दिली आहे.

अब्दुल सत्तारांनी सोडलं मौन, म्हणाले 'मी शिवसैनिक', मग राजीनाम्याची पुडी सोडली कोणी?

अधिकाऱ्यांना इशारा

'मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जलसंपदा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. विदर्भात त्याची गरज आहे, महाराष्ट्राला दुष्काळाला सामोरं जावं लागतं. त्यासाठी पाणी नियोजन करू. भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न करू. चांगले अधिकारी असतील त्यांना खांद्यावर घेऊ. मात्र विनाकारण त्रास दिला तर बच्चू कडू मंत्री आहे हे विसरून जाणार,' असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.

मातोश्रीबाहेर नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री'बाहेर एका शेतकऱ्यासोबत पोलिसांची अरेरावी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी बाप-लेकीला पोलिसांना ताब्यात घेतले. पोलिसांनी शेतकऱ्यासह त्याच्या आठ 8 वर्षाच्या मुलीसोबतही धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जात आहे.

पनवेल येथील देशमुख हे शेतकरी असून आपल्या शेती कर्जासंदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते रविवारी 'मातोश्री'वर आले होते. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी देशमुख यांनी 'मातोश्री'त प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता पोलिसांनी त्यांच्याशी अरेरावी केल्याची माहिती समोर आली आहे.

मातोश्रीवर आलेल्या 'त्या' शेतकऱ्याला सोडण्याचे आदेश पोलिसांना मिळाले आहेत. तसेच शेतकऱ्याचे काय काम आहे, याबाबत विचारपूस करण्यास सांगितले आहे.

मिळालेली माहिती अशी की, देशमुख नावाचे शेतकरी आपल्या समस्या घेऊन पनवेलहून मुंबईत आले होते. त्यांच्यासोबत त्यांची आठ वर्षांची मुलगीही होती. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असून बँक त्यांची अडवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले. मी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे, तरीसुद्धी बँक अडवणूक करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. याच संदर्भात एक फाईल घेऊन देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री बाहेर आले होते. मात्र, दोन-तीन तास मातोश्रीबाहेर थांबूनही देशमुख यांना मुख्यमंत्र्यांना भेटता आले नाही. त्यामुळे त्यांनी मातोश्रीच्या आत जाऊ देण्याची विनंती पोलिसांना केली. ही विनंती नाकारत पोलिसांनी त्यांच्याशी अरेरावी केली. देशमुख आणि त्यांच्या मुलीला पोलिसांनी धक्काबुक्कीही केली.

दरम्यान, 'मातोश्रीबाहेर दिवसभरातून अनेकजण येतात. त्यामुळे अशा प्रकारे आम्हाला वागावे लागते,' असं पोलिसांचं म्हणणं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 5, 2020, 2:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading