औरंगाबाद, 03 डिसेंबर : ग्रामीण भागातील तरुण शासकीय नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने शहरात येतात. घरची परिस्थिती नसतानादेखील काटकसर करून ते शहराच्या ठिकाणी राहातात. यातील प्रत्येक तरुणाला नोकरी लागेल याची शाश्वती नसते. असंच काहीस नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग तरुण नागेश चिलकावार याच्या सोबत घडले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्याला नोकरी मिळवण्यासाठी वारंवार अपयश आले. पण या अपयशातून खचून न जाता कौशल्य आधारित शिक्षण घेऊन त्याने स्वतःचा औरंगाबाद शहरामध्ये एका कंपनीमध्ये एक शॉप आणि इंटरनेट कॅफेचा व्यवसाय सुरू केला आहे. फक्त व्यवसायच सुरू केला नाही तर दोन भावांसह पाच जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील लालवंडी गावच्या नागेश चिलकावार याच्या घरची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची. आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. नागेश याला तीन भाऊ एक बहीण. यामध्ये नागेश हा धाकटा आहे मात्र तो लहानपणापासूनच दिव्यांग आहे. नागेश याचे प्राथमिक शिक्षण हे गावातच झालं आठवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे त्याने शिक्षणासोबत लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर गावात कुरिअरचे काम करायला सुरुवात केली. यातून महिन्याकाठी मिळणाऱ्या पाचशे रुपयांमध्ये त्याने काही पैसे घरी देऊन स्वतःचा खर्च भागवला.
Video : अपूर्ण स्वप्नाला मिळाले पतीचे बळ, शून्यातून सुरुवात करत बनली 4 कंपन्यांची मालकीण
नोकरी मिळवण्यासाठी त्याने डीएडचे शिक्षण पूर्ण करत पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद गाठलं. सरकारी नोकरी मिळून परिस्थितीवर मात मिळवायचे स्वप्न उराशी बाळगून त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी केली तीन वर्षाची तयारी केल्यानंतरही वारंवार परीक्षांमध्ये त्याला अपयश आलं. यात वेळ जात असल्यामुळे त्याने नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि याच्यातूनच कौशल्य आधारित शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
कौशल्या आधारित शिक्षण घेण्यासाठी माहिती घेणाऱ्या नागेश याला औरंगाबाद येथील दिल्ली गेट भागात प्रेरणा दिव्यांग ट्रस्टची माहिती मिळाली. या ट्रस्टमध्ये त्याने नोंदणी करत प्रवेश मिळवला. ट्रस्टमध्ये त्याला कॉम्पुटरचे ज्ञान,मूर्ती बनवणे, चित्रकला, क्राफ्ट प्रशिक्षण मिळालं.
प्रेरणा ट्रस्टमध्ये मिळालेल्या कौशल्या आधारित शिक्षणामुळे त्याला कंपनीचं काम मिळालं. या कंपनी मध्ये त्याने आदित्य इंजिनीरिंग या नावाने एक छोटंसं शॉप उघडले. यामध्ये काही कंपनीचे पार्ट त्याच्याकडे येत होते. त्याने त्याचे डिझाईन बनवले. मात्र, काम वाढल्यामुळे त्याने भावासह इतर लोकांना रोजगार द्यायला सुरुवात केली. आता त्यांच्याकडे तीन तरुण दोन महिला शॉपमध्ये कामाला आहेत. हा व्यवसाय त्यांनी आता लहान भावाला चालवायला दिला आहे.
Success Story : नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी उभारली 'टिश्यू कल्चर लॅब', पाहा, VIDEO
यानंतर त्याने वाळूज भागामध्ये इंटरनेट कॅफे सुरू केला या कॅफेच्या माध्यमातून त्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे. काम वाढल्यामुळे त्याने या ठिकाणी देखील दोन तरुण मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. या ठिकाणी मुलांना 7 हजार रुपये प्रमाणे पगार दिला जातो. सध्या त्याचे वाळुज भागामध्ये स्वतःच घर देखील आहे व गावाकडे राहून मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांना या ठिकाणी बोलावून घेतले आहे. संपूर्ण व्यवसायातून त्याला एकूण 40 हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळतं.
कौशल्य आधारित शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा
तरुणांनी शासकीय नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. मात्र, अपयश येत असेल तर कौशल्य आधारित शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. या कौशल्य आधारित शिक्षणाच्या जोरावर आपण स्वतःचा रोजगार मिळू शकतो. मात्र इतरांनाही रोजगार देता येऊ शकतो. यामुळे तरुणांनी शासकीय नोकरीवर अवलंबून न राहता कौशल्य आधारित शिक्षण घ्यावं असा आग्रह माझा आहे, असं नागेश चिलकावार सांगतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local18