औरंगाबाद, 05 डिसेंबर : विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच बचतीची सवय लागावी यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ‘विद्यार्थी बचत बँक’ सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी बँकेचे व्यवहार स्वतः करू लागले आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
कशी सुचली कल्पना?
बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या ही 60 आहे. शाळेतील शिक्षक शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. एक दिवस शाळेमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू असताना शिक्षकांना अनेक विद्यार्थ्यांचे दात किडलेले आढळून आले. दरम्यान या संदर्भात शिक्षकांनी माहिती घेतली असता विद्यार्थ्यांना शाळेत येताना आई-वडील पैसे सोबत देत असल्याचे आढळून आले. शाळेत सोबत आणलेल्या पैश्याचे मुलं चिप्स, कुरकुरे आणि चॉकलेट मोठ्या प्रमाणात खातात आणि याच्यातूनच त्यांच्या दातांना कीड लागली असल्याचं समोर आले.
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे दिले जातात. यामुळे विद्यार्थ्यांकडून याचा अनावश्यक खर्च होतो आणि याचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन शाळेचे मुख्याध्यापकएन. डी. अहिरे यांनी विद्यार्थ्यांचा अनावश्यक खर्च कसा टाळता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत शाळेपासूनच बँकेचे व्यवहार देखील समजणे गरजेचे आहे. सोबतच त्यांना लहानपणापासूनच पैशांची बचत करणं किती गरजेचे आहे हे लक्षात येणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी बचत बँक सुरू करण्याचे ठरवले.
Mumbai : बुद्धीच्या मशागतीसाठी सलूनमध्ये सुरु केलं ग्रंथालय, पाहा Video
बचत बँकेसाठी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतंत्र बँक खातं तयार केलं आहे. ज्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा खाते क्रमांक समाविष्ट करण्यात आला आहे. त्यासाठी पाच रुपयाची एक वही त्याला त्याची नोंद ठेवण्यासाठी देण्यात आली आहे. या बँकेच्या व्यवहारासाठी विद्यार्थ्यांमध्येच बँक मॅनेजर आणि कॅशिअरची नेमणूक करण्यात आली आहे. बँकेतील प्रत्येक व्यवहाराची नोंद विद्यार्थी काळजीपूर्वक ठेवत असतात.
विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला
विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून पैशांची बचत व बँकेचे व्यवहार समजावे यासाठी आम्ही ही विद्यार्थी बचत बँक सुरू केली आहे. गेल्या चार वर्षापासून आम्ही ही विद्यार्थी बचत बँक चालवत आहोत. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. विद्यार्थ्यांनी साचवलेल्या पैशांमधून यावर्षी आम्ही सहल काढली आहे, असं मुख्याध्यापक एन. डी. अहीरे यांनी सांगितले.
Nashik : पुस्तक खरेदीवर मिळेल 50 टक्के सूट, पाहा कुठं आहे ही ऑफर? Video
आम्हाला आई - वडील शाळेत येताना पैसे द्यायचे. या पैश्याचे आम्ही चॉकलेट, बिस्कीट किंवा बर्फाचे गोळे खात होतो. यामुळे शाळेतील शिक्षकांनी आम्हाला विद्यार्थी बचत बँकेतून पैसे साचवण्याची संकल्पना सुचवली ही आम्हाला खूप आवडली. आमच्याच माध्यमातून हे पैसे जमा केले जातात आणि हे पैसे कसे खर्च करायचे आणि या पैशाचा योग्य वापर कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केलं जातं, असं विद्यार्थिनी श्रावणी काळे हिने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local18