मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वडील, बहीण घरात झोपलेले, दहावीच्या मुलाने रात्रीच्या सुमारास काढली कार अन्.., हादरवणारी घटना

वडील, बहीण घरात झोपलेले, दहावीच्या मुलाने रात्रीच्या सुमारास काढली कार अन्.., हादरवणारी घटना

अपघातग्रस्त वाहन आणि मृत विद्यार्थी

अपघातग्रस्त वाहन आणि मृत विद्यार्थी

दहावीच्या विद्यार्थ्यासोबत भयानक घटना घडली.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Aurangabad, India

  छत्रपती संभाजीनगर, 5 मार्च : राज्यात अपघाताच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील आणि बहीण झोपल्याने 17 वर्षीय मुलाने कार घराबाहेर काढली. जालना रस्त्यावरून सेव्हन हिल्सच्या दिशेने तो निघाला होता. यावेळी कारचा वेग ताशी 120 किमीपर्यंत पोहोचला.

  याचदरम्यान, आकाशवाणी चौकात त्याचे नियंत्रण सुटले आणि कार तब्बल 70 फूट घासत जात एसएफएसमोरील स्कायवॉकच्या पिलरवर जाऊन आदळली. यावेळी कार पिलरमध्ये घुसल्याने अडकून चेंदामेंदा झाला आणि गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. सोहम नीरज नवले असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

  मृत सोहम हा गजानन मंदिर परिसरातील एस्सार पेट्रोल पंपाच्या मागील सुलोचना अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याचे वडील व्यावसायिक आहेत. त्याने यासायंकाळी वडील आणि बहिणीसोबत जेवण केले. नंतर तिघेही कॅनॉटला आइस्क्रीम खाण्यासाठी गेले. 11 वाजता घरी पोहोचल्यानंतर सर्वजण झोपले. मात्र, मध्यरात्री सोहम गुपचूप चावी घेऊन बाहेर पडला. वडिलांची ह्युंदाई असेंट कार सुरू करून शहरात चक्कर मारण्यासाठी निघाला.

  सोहमला चांगल्या रीतीने कार चालवता येत नव्हती तरीही त्याने ती घराबाहेर काढली. तो मोंढ्याकडून सरळ सेव्हन हिल्सच्या दिशेने भरधाव निघाला होता. याचरम्यान, आकाशवाणी चौकात त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. तेथून एसएफएस शाळेपर्यंत कारचे चाक घासल्याचे व्रण रस्त्यावर उमटले. त्यामुळे कार जवळपास 70 फूट दुभाजकाच्या दिशेने घासत जात थेट दुभाजकावर चढली आणि नंतर स्कायवॉकच्या पिलरवर आदळली. ब्रेक घासत जात असताना आवाज आला तोच काही सेकंदांत स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

  दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, रात्र गस्तीवर असलेले सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, जिन्सीच्या उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी धाव घेतली. कार अक्षरक्ष: पिलरमध्ये घुसल्याने दोन भागात कार फुटून पिलर डाव्या बाजूने सोहमपर्यंत आत घुसला होता. पोलीस, अग्निशमनचे जवान व 13 जणांनी कारचा दरवाजा ओढून त्याला बाहेर काढले.

  सॉरी आई-बाबा, अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; 17 वर्षीय विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

  दरम्यान, इकडे सोहमच्या वडिलांना पहाटे तीन वाजता जाग आली आणि तेव्हा सोहम घरात नसल्याचे त्यांना दिसले. त्यात तो मोबाइल वापरत नसल्याने ते घाबरले आणि मुलीला सोबत घेऊन त्याच्या शोधात निघाले. चार वाजता त्यांना आकाशवाणी चौकातील अपघाताची माहिती कळल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा उपनिरीक्षक चव्हाण यांनी त्यांना सोहमची ओळख पटवण्यासाठी घाटीत बोलावले.

  ओळख पटल्यावर जिन्सी पोलिस ठाण्यात वडिलांच्या तक्रारीवरून मृत सोहमवर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली. दरम्यान, 2016 मध्ये सोहमची आई आणि मामेभावाचा एसएफएस शाळेसमोर रस्ता ओलांडताना मृत्यू झाला होता. तेव्हा सोहम चौथीच्या वर्गात शिकत होता. त्यानंतर त्याला मोठी बहीण व वडिलांनी सांभाळले. मात्र, दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी त्याच परिसरात अपघाती मृत्यू झाल्याने वडील, बहिणीला धक्का बसला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  First published:
  top videos

   Tags: Accident, Chhatrapati Sambhaji Nagar, Road accident