उस्मानाबाद, 8 डिसेंबर: दोन तास टीव्ही, मोबाइल बंद करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचं वडगाव गावाने सगळ्यांपुढे आदर्श ठेवला. तोच कित्ता गिरवत आता उस्मानाबादच्या जकेकुरवाडी गावानेही 2 तास टीव्ही आणि मोबाइल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. उमरगा तालुक्यातल्या या गावात ग्रामसभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचं सर्वच स्तरांतून कौतुक होतंय. विशेष म्हणजे गावानं या आधीही काही लोकोपयोगी निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली आहे.
अवघ्या 2200 लोकसंख्येचं गाव
उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातलं जकेकुरवाडी हे छोटंसं गाव आहे. या गावातील घरांची संख्या अंदाजे 330 इतकी असून, या गावची लोकसंख्या 2200 इतकी आहे. त्यापैकी 500 मुलं आहेत. गाव छोटंसं असलं, तरी आज त्याच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. त्याला कारण गावातलं ‘नो टीव्ही, नो मोबाइल’ अभियान. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 35 वर्षांचे अमर सूर्यवंशी गावचे सरपंच म्हणून निवडले गेले. सूर्यवंशी यांचं शिक्षण एमए, बीएडपर्यंत झालं आहे. त्यामुळे शिक्षणाची गरज व त्याचं महत्त्व ते जाणतात. त्याचमुळे त्यांनी गावातल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यातूनच गावातल्या प्रत्येक घरात संध्याकाळी 6 ते 8 असे 2 तास टीव्ही आणि मोबाइल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर गावात संध्याकाळी 6 वाजता भोंगा वाजतो. तेव्हा गावातली सगळी मुलं घरी अभ्यासाला जातात. पालकही मुलांना शोधून घरी घेऊन जातात.
हेही वाचा : Gujarat Assembly Elections : गुजरात निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
गावात गुटखा बंदी
गावाने आणखीही काही चांगले निर्णय घेतले आहेत. गावातली काही मुलं आधी गुटखा खात होती. ते थांबवण्यासाठी गावात गुटख्यावर बंदी घालण्यात आली. गावात गुटखा विकणाऱ्याला 5 हजार रुपयांचा, तर खाणाऱ्याला 500 रुपयांचा दंड करण्याचा निर्णय झाला. यामुळे गावात गुटखा खाण्याचं प्रमाण कमी झालं. आता दोन तास टीव्ही आणि मोबाइल बंद केल्यामुळे मुलांना अभ्यासाची गोडी लागली असून, गावातली मुलं आता आयएएस, आयपीएस होण्याची स्वप्न पाहतात, असं गावातले दत्तात्रय सूर्यवंशी यांनी सांगितलं.
हेही वाचा : उद्धवजींकडे एकच अस्त्र, 'टोमणे अस्त्र' त्यामुळे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंच्या 'त्या' आरोपांवर हल्लाबोल
कोरोना काळात मोबाईलचा वापर वाढला
कोरोना महामारीमुळे घरात बसलेल्या नागरिकांना टीव्ही आणि मोबाइलची जास्त सवय लागली. मुलंही त्याच्या आहारी जाऊ लागली. याचा परिणाम अभ्यासावर होत असल्यानं असे निर्णय घेतले जाऊ लागले आहे. पुढच्या पिढीचं भविष्य मोबाइल आणि टीव्हीमुळे खराब होऊ नये, यासाठी गावांनी पुढाकार घेतला. संपूर्ण गावातच काही काळ टीव्ही आणि मोबाइल बंद करण्याचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. त्यामुळे मुलांचं मोबाइलचं व्यसन कमी होईल का याबाबत शंका असली, तरी अभ्यासासाठी हा वेळ निश्चित सत्कारणी लागू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.