नवी दिल्ली, 8 डिसेंबर : आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. गुजरातमध्ये भाजपाला ऐतिहासिक असा विजय मिळाला आहे. तब्बल 156 जागांवर भाजपाने निर्णायक आघाडी घेतली आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेस आणि आपची पिछेहाट झाल्याचं दिसत आहे. गुजरातमध्ये काँग्रेस अवघ्या 17 जागांवर आघाडीवर आहे, तर आपला या निवडणुकीत 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये भाजपाचा रेकॉर्डब्रेक असा विजय झाला आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. सोबतच त्यांनी विरोधकांनाही इशाराही दिला आहे. नेमकं काय म्हटलं मोदींनी? गुजरातमध्ये पुन्हा एकदा मतदारांनी भाजपावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी गुजरामधील जनतेचे आभार मानतो. हा विजय कार्यकर्त्यांचा देखील आहे. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच भाजपाला ही मजल मारता आली, त्यामुळे मी कार्यकर्त्यांचे देखील आभार मानतो. गुजरातमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय झाला आहे. आज जी आकडेवारी समोर आली आहे, ती भविष्यातील चित्र स्पष्ट करणारी असल्याचं म्हणत मोदींनी एकप्रकारे विरोधकांना इशारा दिला आहे. तसेच त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आम्हाला काँग्रेसच्या तुलनेत एक टक्के मतदान कमी झालं. मात्र आम्ही हिमाचल प्रदेशच्या विकासासाठी सदैव कट्टीबद्ध राहू असं मोदींनी म्हटलं आहे.
दिल्लीच्या भाजप मुख्यालयात उत्साहाचे वातावरण गुजरातमध्ये भाजपाचा ऐतिहासिक असा विजय झाला आहे. गुजरात निवडणूक निकालानंतर दिल्लीच्या भाजप मुख्यालयात उत्साहाचं वातावरण आहे. भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सर्व मुख्यालयात दाखल झाले आहेत.