मुंबई, 11 सप्टेंबर : महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावासाचा कहर बघायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी जीवितहानीदेखील होताना दिसत आहे. याशिवाय अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. हा पाऊस आणखी किती दिवस अशाप्रकारे बरसत राहील याबाबत अनिश्चितता आहे. पण पावसामुळे सध्याच्या घडीला सर्वसामान्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. विशेष म्हणजे आज औरंगाबाद आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्क ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. या पावसामुळे औरंगाबादमध्ये एक वयोवृद्ध महिलेसह दोन अल्पवयीन मुली वाहून गेल्या होत्या. त्यांना नदीतून बाहेर काढण्यासाठी गावकरी, पोलीस आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी शर्थीने प्रयत्न केले. पण तरीही एका 14 वर्षीय मुलीचा तपास लागलेला नाही.
औरंगाबादमध्ये आज दुपारी अचानक ढगफुटीसदृश पाऊस पडला. जिल्ह्यातील तिसगाव परिसरातील देवगिरी नदीला पूर आला. या पुरामुळे आज मोठी दुर्घटना घडली. पुरात एक वयोवृद्ध महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. त्यानंतर गावकरी, पोलीस आणि प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी एकवटले. त्यांनी वृद्धेला आणि दोन्ही मुलींना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. यावेळी महिला आणि एका मुलीला वाचविण्यात त्यांना यश आले आहे. पण 14 वर्षांची मुलगी अद्याप सापडलेली नाही. तिचा शोध सुरू आहे. त्यांच्या बचाव कार्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अतिशय थरारक असे ते दृश्य आहेत.
औरंगाबादमध्ये ढगफुटीसदृश पाऊल, एक वृद्ध महिला आणि दोन मुली वाहून गेल्या, दोघांना वाचवण्यात यश #Aurangabad #rain pic.twitter.com/ccv5FLkCbT
— News18Lokmat (@News18lokmat) September 11, 2022
सिंधुदुर्गातही ढगफुटीसदृश पाऊस
औरंगाबाद पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. काल संध्याकाळपासून सुरु झालेल्या दमदार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपलंय. जिल्ह्यात सर्वच नद्यांना पूर आलाय. सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. कुडाळ शहराच्या बाजूने वाहणाऱ्या भंगसाळ नदीला पूर आला आहे. नागरिकांच्या घरातही पाणी घुसलंय. तर कुडाळ गुलमोहोर हॉटेल ते नवीन एसटी स्टॅन्ड हा मार्ग पाणी आल्याने बंद झालाय. काल संध्याकाळपासून सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरु असून रात्री 1 पासून या पावसानं नॉनस्टॉप बॅटिंग सुरु ठेवलीय. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेलीय. हातेरी, पीठढवळ, निर्मला, गडनदी, सुख नदी, तेरेखोल नद्यांची पातळी वाढली असून नजीकच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कुडाळ शहरानजीक असलेल्या भंगसाळ नदीचे पाणी काळप नाका परिसरात घुसल्याने येथील भंगारविक्रत्यांच्या घरात पाणी घुसले. यामुळे त्यांचे भंगार सामान वाहून गेलंय.
सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO... #rain #sindhudurg pic.twitter.com/ZrioTFhu3Q
— News18Lokmat (@News18lokmat) September 11, 2022
कोल्हापुरातही पावसाचा कहर, राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले
कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने थैमान घातल्याने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यासह विविध ठिकाणी पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. आज (दि. 11) सकाळी 11 च्या सुमारास राधानगरी धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला. यानंतर पाठोपाठ तासाबराच्या अंतराने अजून दोन दरवाजे उघडल्याची माहिती देण्यात आली.
या दरवाज्यांमधून 5884 क्युसेक्स तर विजगृहातून 1600 क्युसेकस असा एकूण 7484 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. गेल्या चोवीस तासांत 79 मीमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर 3913 मीमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कसबा बावडा येथील राजाराम बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. तर कालपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी 17 फुटावर गेली आहे. बंधाऱ्यावरून यातूनच धोकादायकरित्या वाहतूक सुरू आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात चौथ्यांदा राजाराम बंधाऱ्यावरून पंचगंगेचे पाणी वाहत आहे. याचबरोबर जिल्ह्यातील अन्य बंधारेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढचे दोन दिवस पाऊस असाच राहिल्यास नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
जळगावात मुसळधार पाऊस
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज रविवारी दुपारच्या सुमारात मुसळधार पाऊस झाला. यावेळी अनेक जण आपली सुट्टी आपल्या परिवारासोबत मनवण्यासाठी बाहेर टूरला निघाले असताना दुपारी अचानक ऊन असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाले. यावेळी जोरदार वाऱ्यांसह विजेच्या कडकडाट होऊन जळगाव शहरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले होते. तर दुपारी अनेक जण बाहेर निघाले असताना त्यांना अचानक आलेल्या पावसाचा मोठा फटका बसला तर दुसरीकडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याचे चित्रही पहावयास मिळाले.
बुलढाणा जिल्ह्यात आलेल्या वादळी पावसानं शेतीच नुकसान
बुलढाणा जिल्ह्यात रात्री झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी शेतीच नुकसान केल आहे. संग्रामपूर तालुक्यातील लाडणापुर येथे कपाशीच पीक जमीनदोस्त झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. गेल्या 2 दिवसापासून शेतकऱ्यांना या पावसाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जाताना पहावा लागत आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या पिकावर पावसाने आक्रमण केलं आहे. त्यामुळे तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा सर्वदूर संततधार पाऊस
आठ दिवसाच्या उघडीपनंतर आज सकाळपासून यवतमाळ जिल्ह्यात 16 ही तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. पण आज पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. राळेगाव, उमरखेड, पुसद, वणी, मारेगाव, यवतमाळ, नेर या तालुक्यात पावसाचा जोर आहे. आधीच अतिपावसमुळे सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचे नुकसान झाले होते. यातून शेतकरी सावरत नाही तर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अतिपाण्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
अमरावतीत पावसाची धुव्वाधार बॅटींग
गेल्या चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अमरावती शहरासह ग्रामीण भागात पावसाची तुफान बॅटींग सुरू आहे. गेल्या तासाभरा पासून अमरावतीत तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळे मात्र नागरिकांची पार दाणादाण उडाली आहे. पुढील तीन दिवस असाच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.