औरंगाबाद, 30 ऑगस्ट : कोरोनाने प्रत्येकाला आरोग्य व पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिलं. कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव ( Ganesha Festival 2022 ) उत्साहात साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक ( eco friendly ) साजरा व्हावा यासाठी लाहोटी कुटुंबीयांतर्फे शेणापासून गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या गणेश मूर्तींचा विसर्जनानंतर देखील झाडाला खत म्हणून वापर करता येणार आहे. लाहोटी कुटुंबीयांच्या या संकल्पनेमुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत असून मूर्तींना शहरातच नाही तर मुंबई, पुणे, हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये देखील मागणी वाढली आहे.
शहरातील गारखेडा परिसरामध्ये असलेल्या आदिनाथ नगरमध्ये राहणाऱ्या मूर्तिकार सुनंदा लाहोटी व त्यांच्या मुलांनी मिळून या मूर्ती तयार केल्या आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला त्यांना ही संकल्पना सुचली त्यानंतर त्यांनी मूर्ती तयार करायचे ठरवलं. मात्र, यासाठी त्यांना जागा कमी पडत असल्यामुळे त्यांनी एमआयडीसी भागामध्ये एक युनिट घेतलं आणि त्यामध्ये मूर्ती तयार केल्या आहेत.
हेही वाचा : गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीनं अगदी झटपट बनवा उकडीचे मोदक, पाहा VIDEO
या गणेश मूर्ती 'पंचगव्य' म्हणजे गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेणापासून तयार केल्या आहेत. शेणापासून बनवलेल्या गणेश मूर्ती तयार करताना मुलतानी माती, हळद, डिंक, लाल चंदन पावडर आणि सेंद्रीय - रंगाचा वापर झाला आहे. एका दिवसामध्ये 3 ते 4 मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. मूर्तीचे घरी विसर्जन करता येते. विसर्जन झाल्यावर पाच दिवसांनी मूर्ती विसर्जन केलेले पाणी आणि साधे तीन लिटर एकत्र करून झाडांना देता येते. खत म्हणूनही या पाण्याचा वापर करता येणार आहे. या मुर्तींची किंमत 500 रुपयांपासून ते 1300 रुपयापर्यंत आहे.
दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर निर्बंध मुक्त साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अडचणींना पण आताच थांबवू शकू एवढेच आम्ही नागरिकांना सांगू इच्छितो असे यावेळी मूर्तिकार सुनंदा लाहोटी यांनी सांगितले.
हेही वाचा : Beed : यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO
या ठिकाणी मिळतील मूर्ती
तुम्हाला या शेणाच्या व नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्ती खरेदी करायच्या असतील तर मूर्तीकार सुनंदा लाहोटी यांच्या घरी जाऊन खरेदी करू शकता.
फ्लॅट क्रमांक 15 आनंद बिल्डिंग आदिनाथ नगर, पॉईंट हॉस्पिटल समोर, गारखेडा परिसर औरंगाबाद हा पत्ता आहे. अधिक माहितीसाठी या मोबाईल क्रमांकवर 7558480743 संपर्क साधू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, Eco friendly, Ganesh chaturthi