पैठण, 12 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज औरंगाबाद आणि पैठणच्या दौऱ्यावर होते. मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांनी शक्तीप्रदर्शन केलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचं दिल्लीमध्ये राष्ट्रीय संमेलन झालं, या संमेलनात अजित पवारांचं (Ajit Pawar) भाषण न झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा झाल्या, यावरून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना टोला हाणला. ‘कसं काय पाटील बरं आहे का? दिल्लीत जे घडलं ते खरं आहे का?’ असं एकनाथ शिंदे भर सभेत म्हणाले. जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेता व्हायचं होतं, ते होता आलं नाही म्हणून अजित पवारांना बोलू दिलं नाही, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. कॅमेरा, दादा-ताई अन् अजित पवारांचं न झालेलं भाषण, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीवर घणाघात अजित पवारांचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या भाषणाची मागणी केली. जयंत पाटील यांना आपल्यापूर्वी बोलण्याची संधी दिल्याने अजित पवार नाराज होऊन निघून गेल्याची चर्चा समोर आली होती. विशेष म्हणजे अजित पवार हे व्यासपीठावरुन निघून जात असताना प्रफुल्ल पटेल यांनी माईकवरुन अजित पवारांना थांबण्याची विनंती केल्याचंही दिसून आलं. मात्र, अजित पवार आलेच नाहीत.
या सगळ्या वादावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हे राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे फक्त राष्ट्रीय पातळीवरचे नेते बोलले. मी राज्याचा नेता असल्यामुळे राज्यातल्या गोष्टींवरच बोलतो. मी वॉशरूमसाठी बाहेर गेलो, तरी अजित पवार नाराज म्हणून बातम्या चालवल्या गेल्या. नाराज असण्याचा बातम्या कपोलकल्पीत आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.