औरंगाबाद 05 नोव्हेंबर : काँग्रेसचे 22 आमदार फुटणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तशी तयारी केली आहे, असा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. यानंतर नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सणसणीत टोला लगावला. यावर आता खैरे यांनी आपले शब्द मागे घेत असल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त करण्याची तयारीही दाखवली आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला, नाना पटोलेंनी चंद्रकांत खैरेंना सुनावलं, म्हणाले...
काँग्रेसचे 22 आमदार फुटणार असं मी बोललो ही जुनी बातमी आहे.यावर नाना पटोले नाराज झाले. त्यांची नाराजी मी दूर करेन. माझा असा कोणताही उद्देश नव्हता.भाजप पक्ष संपवण्यासाठी काहीही करू शकतं. यासाठी मी तसं बोललो. माझे शब्द मी मागे घेतो. वाटले तर मी दिलगिरी व्यक्त करेन. महाविकास आघाडीमध्ये नाराजी नको म्हणून मी शब्द मागे घेतो, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. यासोबतच काँग्रेस दुखावली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत खैरेंनी आपलं विधान मागे घेतलं आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे ?
कोर्टाने निर्णय दिला तर शिंदे गटाचे 16 आमदार बाद ठरले जातील. त्यामुळे हे सरकार कोसळणार आहे. त्यामुळे आपले मुख्यमंत्रिपद कायम राहावे यासाठी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहे. देवेंद्र फडणवीस हुशार माणूस आहे. काँग्रेसची सध्या रॅली सुरू आहे. त्यामुळे सगळे शांत बसलेले आहे, असा दावाच चंद्रकांत खैरे यांनी केला होता.
'मी मुस्लीम आहे, पांडुरंग माझं आधी ऐकेल'; अब्दुल सत्तारांचं देवाकडे 'हे' साकडं
नाना पटोलेंचा खैरेंना टोला -
'जे सत्तेत राहून आपला पक्ष सांभाळू शकले नाही, त्यांना काँग्रेसबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही' असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सणसणीत टोला लगावला. त्याच्यामुळे दुसरं काही बोलण्याची गरज नाही. पहिले आपलं घर पाहायचं आणि मग दुसऱ्यांच्या घरावर रेघोट्या मारायच्या. जे काही होणारच नाही. त्यांच्याबद्दल कोणी बोलायला निघाले असतील. सत्तेत राहून स्वत: घर सांभाळू शकले नाही, त्यांनी यावर बोलू नये, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.