औरंगाबाद, 22 नोव्हेंबर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल डिफेन्स या देशातील कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत औरंगाबादच्या अनुष्का बोर्डेनं बाजी मारली आहे. अनुष्कानं देशात दुसरी आणि मुलींमध्ये पहिले येण्याचा मान मिळवलाय. अनुष्काचे वडील स्टेशनरी दुकानदार आहेत. सामान्य कुटुंबातील अनुष्कानं जिद्दीच्या जोरावर लष्करी सेवेत जाण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
प्रेरणादायी प्रवास
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाघरुळ दाभाडी हे बोर्डे कुटुंबीयांचं मुळ गाव. साधारण 30 वर्षांपूर्वी ते औरंगाबाद शहरातील आकाशवाणी परिसरामध्ये असलेल्या अपेक्स हॉस्पिटल जवळच्या भागात स्थायिक झाले. अनुष्काचे वडिल स्टेशनरी आणि झेरॉक्स दुकान चालवतात, तर आई गृहिणी आहेत. बोर्डे पती-पत्नींना स्वत:चं स्वप्न पूर्ण करणे शक्य झालं नाही. त्यामुळे मुलांनी शिकून मोठं व्हावं ही त्यांची मनापासून इच्छा होती.
लहानपणापासूनच हुशार असलेल्या अनुष्काचं प्राथमिक शिक्षण हे औरंगाबादमधल्या लिटिल स्कोर अकॅडमीमध्ये झालं. त्यानंतर पोलीस पब्लिक स्कूलमध्ये तिनं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. शाळेतील प्रत्येक परीक्षेत चांगले मार्क्स मिळवणाऱ्या अनुष्काला बारावीला 91 टक्के मार्क्स पडले होते. तिनं आयएएस व्हावं असं तिच्या आई-वडिलांंचं स्वप्न होतं.
विकत न घेता भाडेतत्वावर वाचा कोणतेही पुस्तक, विद्यार्थ्यांनीच सुरू केलं नवं स्टार्टअप!
50 दिवसांमध्ये अभ्यास
अनुष्काला शाळेतील शिक्षकांकडून सैन्य दलाबद्दलची माहिती मिळाली होती. त्यांनी सैन्यात करिअर करण्यासाठी अनुष्काला प्रेरित केलं. या विषयावरची पुस्तकं वाचल्यानंतर सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा तिनं निर्धार केला. मुलींना पदवीनंतर सैन्यात प्रवेश मिळत असल्यानं तिनं सुरूवातीला इंजिनिअरिंग करण्याचं ठरवलं. पण, काही महिन्यांपूर्वी मुलींचा 12 वी नंतर सैन्यात प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला. अनुष्कानं या संधीचं सोनं करायचं ठरवलं.
मुलींना बारावीनंतर सैन्यात प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला त्यावेळी अनुष्काकडं अभ्यासासाठी फक्त 50 दिवस होते. या कालावधीमध्ये तिला सर्व विषयांचा अभ्यास करायचा होता. अनुष्कानं या कालावधीमध्ये रोज दहा ते अकरा तास अभ्यास केला. पहाटे चार वाजता उठून अभ्यासाला सुरूवात केली. गणित आणि सामान्यज्ञान या विषयाकडं विशेष लक्ष दिलं, असं ती सांगते. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केल्यानं परीक्षेच्या वेळी दडपण आलं नाही. परीक्षा दिल्यानंतर आपण त्यामध्ये यशस्वी होऊ हा आत्मविश्वास होता. प्रत्यक्षात देशात दुसरी आल्याचं समजल्यावर आनंद गगनात मावत नव्हता, असं अनुष्का म्हणाली.
11 वर्षांच्या मुलाने रचला इतिहास; IQ टेस्टमध्ये मिळाले 162 गुण; दिग्गज शास्त्रज्ञांना टाकलं मागे
आम्हाला अनुष्काचा अभिमान
'अनुष्का लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होती. वाचन, खेळ, चित्रकला, गायन, डान्स हे सर्व तिचे छंद आहेत. सैन्याची आवड निर्माण झाल्यानंतर तिनं या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आमच्या कुटुंबामध्ये आतापर्यंत एवढं मोठं यश कुणीच प्राप्त केलं नाही आमच्या मुलीने हे यश मिळवल्यानं आम्हाला तिचा अभिमान वाटतो,' असे अनुष्काचे वडील अनिल बोर्डे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local18, NDA, Success story