उस्मानाबाद, 04 नोव्हेंबर : घरातील व्यक्ती आजारी रहात असल्यामुळे अंधश्रद्धेचे अघोरी कृत्य (black magic) करण्याचा प्रकार तालुक्यातील नाईचाकूर येथील एका कुटुंबाच्या घरात उघडकीस आला आहे. चार बाय चार आकाराचा (रुंदी, लांबी व खोली) खड्डा करुन त्यात पूजेचं साहित्य ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 2 महिलांसह एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाईचाकूर येथे हैदर महेबुब मुल्ला यांच्या नावे भुकंपतील पूर्नवसित घर आहे. हैदर मुल्ला यांचे निधन झाल्याने दोन खोलीच्या घरात कुणीही रहात नव्हते. या घरात तैसिन पाशामियाँ मुल्ला हिने घरात मोठा खड्डा खोदला असून तेथे कसली तरी पुजा करणार असल्याची माहिती आतिक महेबूब मुल्ला यांनी पोलीस पाटील बाळू स्वामी यांना दिली.
महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? राऊतांचा भाजपवर निशाणा
वाळू स्वामी यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माधव विठ्ठ्ल पवार, राजेंद्र काशीनाथ डिगुळे, गोविंद माधवराव पवार व अन्य लोकांना घेऊन त्या घराची पाहणी केली, असता एका खोलीत फरशा काढून एक मोठा खड्डा खोदलेला दिसला, त्यामध्ये फुटलेले नारळ, लिंबू असे पूजेचं साहित्य आढळून आले होते. तसंच बाजुस दोन टिकाव, फावडा पडलेला दिसून आला व बाजूच्या खोलीमध्ये 3 कलताणी पोते, दोन लिंबू व नारळ असे साहित्य अघोरी प्रथा व जादुटोणा करून पडलेले दिसले.
या बाबत गावातील सर्व लोकांनी तैसिन पाशामियाँ मुल्ला यांना विचारपुस केली असता तिने असे सांगितले की, 'माझी उमरगा येथील बहीण नामे नसरिन शौकत पटेल ही जास्त आजारी पडत असल्यामुळे तिला एका अज्ञात मांत्रिकाने तुम्ही तुमच्या बंद घरात खड्डा खोदून त्यात नारळ, लिंबू पुजा करून टाका' असे सांगितले. त्यानुसार मी स्वतः, माझी बहिण नसरिन पटेल, बहिणीचा मुलगा अरबाज शौकत पटेल 24 ऑक्टोबरला रात्री बारा वाजता आमचे जुने बंद घरातील खोलीमध्ये खड्डा खोदून त्यामध्ये लिंबू नारळ व पूजा करणार होतो', असंही तिने सांगितलं.
नशीबच वाईट! हैदराबाद मुळे नाही तर 'त्या' 9 चेंडूंमुळे IPL बाहेर गेली KKR
दरम्यान, हा प्रकार अंधश्रद्धेतून केल्याचे प्रथमदर्शनी दिसल्याने पोलीस पाटील स्वामी यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसूरे, बीट अंमलदार दत्ता शिंदे व अन्य कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तेहसिन मुल्ला, अरबाज पटेल यांनी नसरिन पटेल ही आजारी पडत असल्याने कोणत्या तरी मांत्रिकाच्या सांगण्यानुसार, अंधश्रद्धेचे अघोरी प्रकारे कृत्य करणार होते किंवा नाही की, आणखी कोणता दुसरा प्रकार आहे, हे तपासातून कळणार असून या प्रकरणी पोलीस पाटील बाळू स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.