मुंबई, 10 ऑगस्ट : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. विधिमंडळ कामकाज समितीमध्ये ठाकरे गटामधल्या एकाही आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून दादा भुसे (Dada Bhuse) आणि उदय सामंत (Uday Samant) यांची या समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी पत्र लिहून समितीच्या सदस्यपदासाठीच्या नियुक्तीचं पत्र द्यावं आणि समितीच्या बैठकीला आमंत्रित करावं, अशी मागणी पत्र लिहून प्रधान सचिवांकडे केली होती, पण विधानसभा अध्यक्षांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे.
विधिमंडळ कामकाज समितीतल्या सदस्य नियुक्तीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतर पक्षांच्या गटनेत्यांना विधिमंडळ सचिवांनी पत्र पाठवलं आहे, पण उद्धव ठाकरे यांच्या गटाला असं पत्र मिळालेलं नाही. महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी यांची गटनेतेपदी तर सुनिल प्रभू यांची प्रतोदपदी नियुक्ती केली होती.
प्रत्येक अधिवेशनाआधी विधिमंडळ कामकाज समितीची बैठक होते. या बैठकीत विधिमंडळाच्या कामकाजाबाबत चर्चा केली जाते. यंदाचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे, त्यामुळे ते वादळी ठरणार हे निश्चित आहे.
विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष अशा एकूण 50 आमदारांना घेऊन बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांच्या शपथविधीनंतर काल भाजपच्या 9 आणि एकनाथ शिंदेंच्या 9 अशा 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena, Uddhav Thackeray