मुंबई, 17 ऑक्टोबर : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीतून माघार घेणं हीच रमेश लटके यांना श्रद्धांजली ठरेल, असं पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलं, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली. एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडूनही अशीच भावना व्यक्त करण्यात आली. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपने माघार घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा संवेदनशील राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पत्र म्हणजे भाजपची स्क्रीप्ट आहे. ‘राज ठाकरेंच्या पत्राचा परिणाम खरंच भाजपवर होत असेल किंवा भाजप त्यांचं ऐकत असेल, तर राज ठाकरेंनी आणखी एक पत्र लिहावं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वारंवार महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असे राज्यपाल तथाकथित महाशक्तीने परत बोलावले पाहिजेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी पत्र लिहा,’ असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
भाजपचा संवेदनशील राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र म्हणजे भाजपाची स्क्रिप्ट आहे.@OfficeofUT @AhirsachinAhir @AUThackeray @SaamanaOnline @ShivsenaComms pic.twitter.com/W6ql5mVcZu
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) October 17, 2022
‘भाजपला पराभव दिसत होता, सगळ्या एजन्सीनी भाजपचा पराभव होईल, असे सांगितले होते. राजकीय नेत्यांच्या आवाहनानंतर माघार घेणे हा मुलामा आहे. भाजपला संवेदनशील राजकारण आणि संस्कृती जपायची असती, तर त्यांनी कोल्हापूर आणि पंढरपूर पोटनिवडणुकीतून माघार घेतली असती,’ अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.