मुंबई, 28 ऑक्टोबर : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. मागच्या तीन महिन्यांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आणखी एक समस्या त्यांच्यापुढे आली आहे. दरम्यान प्रतिष्ठेची मानली जाणारी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटासमोर आता नवा वाद समोर आला आहे. एका अपक्ष उमेदवाराने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून उमेदवारी मागे घेण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा आरोप करून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे.
ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्वची निवडणूक लढवली जात आहे. यामध्ये प्रतिस्फर्धी विरोधक भापजने माघार घेतल्यानंतर ही निवडणूक सोपी मानली जात असली तरी ठाकरे गटावर पुन्हा एकदा नवी समस्या उद्भवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय सुकर मानला जात होता. मात्र, त्यानंतर आता एका अपक्ष उमेदवाराने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून उमेदवारी मागे घेण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा आरोप करून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा : 'त्यांची परिस्थिती नांदायची इच्छा नसलेल्या बाईसारखी, जी..'; शिंदे गटातील अंतर्गत वादावर राष्ट्रवादीचा निशाणा
भाजपने माघार घेतल्यानंतर अन्य उमेदवार अद्यापही रिगणात असल्याने ठाकरे गटाकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. याबाबत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहित तक्रार केली आहे. या पत्रात उमेदवारी मागे घेण्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ही पोटनिवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी मिलिंद कांबळे यांनी या पत्राद्वारे केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने या पत्राची दखल घेतली आहे. याबाबत आता काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. तसे धमकीही देण्यात आल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला होता. याशिवाय अन्य अपक्ष उमेदवारांवर दबाव टाकून त्यांनाही निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी तक्रार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
हे ही वाचा : शिंदे सरकारची मेगा पोलीस भरती, 14 हजार 956 जागांच्या पोलीस भरतीची निघाली जाहिरात
अंधेरी पोटनिवडणुपूर्वी आयोगाने आचारसंहिताही लागू केली आहे. 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत. अशातच आता अंधेरी पोटनिवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. आता नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andheri, Andheri East Bypoll, Cm eknath shinde, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)