मुंबई, 16 मे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वजनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी टीका केली होती. यावर फडणवीस यांनी रविवारी घेतलेल्या सभेत मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या वादात देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी उडी घेतली आहे. ट्विट करुन त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
अमृता फडणवीस यांनी एक चारोळी शेअर केली आहे. वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया ... 🙃#Maharashtra
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 16, 2022
तुम्ही आधीच हलक्या वजनाचे होते आणि त्यांनी तुमचं वजन आणखी कमी केलंय, अशा आशयाच्या हिंदीतील ओळी ट्विट करत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
अमृता फडणवीस यांचं Tweet
वज़नदार ने हल्के को,
बस हल्के से ही वज़न से,
कल ‘हल्का’ कर दिया ...
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी एका सभेदरम्यान बाबरी पाडण्यावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. तसंच बाबरी पाडली त्यावेळी मी तिथे होतो, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली होती.
बाबरी पडली तेव्हा अयोध्येत शिवसैनिक नव्हते, मी तेथे गेलो होतो, असे फडणवीस म्हणतात. अरे त्यावेळी तुमचं वय काय होतं? तेव्हा अयोध्येला शाळेची किंवा कॉलेजची सहल गेली होती का? तुमचं वय काय होतं, तुम्ही बोलताय काय? तुम्ही आमच्यावर शंका घेता. मग मी देखील देवेंद्र फडणवीसांना एक सवाल विचारतो, तुम्ही देशासाठी सोडा हिंदुत्वासाठी काय केलं, हे सांगा. भाजपाने बाबरी पाडलीच नाही. पण देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याठिकाणी असतात आणि बाबरी मशिदीवर नुसता चढायचा प्रयत्न केला असतात तर तुमच्या वजनानेच बाबरी मशीद खाली आली असती, असा टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला होता.
देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
उद्धव ठाकरे म्हणाले होते की बाबरीवर पाय ठेवला असता तर बाबरी पडली असती. पण त्यांना सांगायचं आहे की, आज माझं वजन 102 किलो आहे. बाबरी पाडायला गेलो त्यावेळी माझं वजन 128 किलो होतं. त्यात लाजण्यासारखं काय आहे? मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसांची भाषा कळत नाही. त्यांना एफएसआयची भाषा कळते. सामान्य माणसाचा एफएसआय 1 असेल तर आज माझा 2 आहे. बाबरी पाडताना तो 2.5 होता, असं फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं. तसंच बाबरी तर पाडली. पण, तुमच्या सत्तेचा ढाचा लवकरच पाडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amruta fadanvis, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray (Politician)