नवी दिल्ली, 8 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. याचे पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. यावेळी सभागृहात छत्रपतींविषयी मी बोलत असताना माझा माईक बंद केल्याचा गंभीर आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. ट्विटरवरुन व्हिडीओ प्रसिद्ध करुन याची माहिती खासदार कोल्हे यांनी दिली आहे. काय म्हणाले अमोल कोल्हे? संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही. आज संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलत असताना माईक मध्येच बंद करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांविषयी बोलताना कायद्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी मी करत होतो. जेणेकरून आपल्या अस्मितेला नख लावण्याचं आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं धारिष्ट कोणीच करणार नाही. यामुळे मी व्हिडीओच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत आहे.
संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही!!
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 8, 2022
जय भवानी, जय शिवराय🚩🚩#ParliamentWinterSession #ChhatrapatiShivajiMaharaj #JaiBhavaniJaiShivray pic.twitter.com/XlUVy3ipEu
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचेही संसदेत पडसाद कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादचे पडसादही संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले. एकीकडे ठाकरे गटाच्या खासदारांनी हातात पोस्टर घेऊन सभागृहाबाहेर आंदोलन केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात केंद्राने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. या संदर्भात सर्वपक्षीय खासदारांना घेऊन सुप्रिया सुळे गृहमंत्री अमित शाह यांना भेटणारा होत्या. मात्र, शाह यांनी आज दिलेली वेळ रद्द केल्याची माहिती मिळत आहे. वाचा - Gujarat Election Results : ‘गॉडमदर’च्या मुलाचा ‘पॉवर’ गेम पवारांना पडला भारी; NCP ने तिकीट नाकारलेलं तरी मैदानात उतरून उलटवली बाजी महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला विराट मोर्चा राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्य भाजप नेत्यांचे छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले व अन्य महापुरुषांविषयी बेताल वक्तव्ये. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रद्रोही विधाने, सीमाप्रश्नी इतर राज्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांच्या कटकारस्थानास राज्य सरकारची फूस असणे. सत्ताधारी नेत्यांची महिला व अन्य नेत्यांविरुद्ध बेताल वक्तव्ये तसेच महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला नेऊन राज्यातील तरुणांची फसवणूक केल्यामुळे महाविकास आघाडीकडून राज्य सरकारविरोधात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का सागला असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून त्याविरोधात आता येत्या 17 डिसेंबर रोजी भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.