Home /News /maharashtra /

Why I Killed Gandhi : अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Why I Killed Gandhi : अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे लवकरच मोठ्या पडद्यावर नथूराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण त्यांच्या या नव्या चित्रपटावरुनच एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 20 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे लवकरच मोठ्या पडद्यावर नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण त्यांच्या या नव्या चित्रपटावरुनच एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात काम करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. अमोल कोल्हे यांच्या या चित्रपटावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, या चित्रपटावर अमोल कोल्हे यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले? "सोपी आणि साधी गोष्ट आहे. आपण कलाकार म्हणून ज्या भूमिका करतो त्यातील प्रत्येक भूमिकेशी आपली सहमती असते. काही घटनांशी आपली 100 टक्के वैचारिक सहमती असते. तर काही भूमिकांशी वैचारिक सहमती नसते. तरी सुद्धा ती भूमिका आव्हानात्मक वाटते. मी माझ्या फेसबुक पोस्टमध्ये जे लिहिलं आहे त्याशी मी शंभर टक्के सहमत आहे. मी 2017 साली त्या चित्रपटात काम केलं आहे. हा चित्रपट आता रिलिज होतोय. या मधल्या काळात आता बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. मी नथ्थूराम गोडसेच्या उदात्तीकरणाची भूमिका कधीच घेतलेली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणाला कलाकार म्हणून ही भूमिका मांडायची असेल कलाकार म्हणून मी काम केलेलं आहे. यामध्ये कोणतीही गोष्ट नाकारण्याचं किंवा लपविण्याचं कोणतंही कारण नाही हे मला प्रामाणिकपणे वाटतं. व्यक्ती म्हणून मला विचार स्वातंत्र्य आहे आणि कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या दोन्हींची गल्लत होऊ नये, अशीच माझी अपेक्षा आहे", अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली. Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो बघा : "मी गांधीजींचा वध केला. मी त्या कार्यक्रमाची वीर सावरकरांना जराही माहिती दिली नाही. अमानुषपणे झालेल्या या विभाजनात दीड कोटी लोक बेघर झाले आहेत आणि लाखोंनी आपला जीव गमावला आहे", असे वाक्य अमोल कोल्हे या टीझरमध्ये बोलताना दिसत आहेत. "पाकिस्तानात हिंदू जात आणि संस्कृतीला मिटविण्यासाठी जे अत्याचार होत आहेत त्याचं मुळ कारण गांधीच आहेत", असंही अमोल कोल्हे या चित्रपटात म्हणताना दिसत आहे. (शाळा सुरू होणार; पण मुंबईत पालकांचं संमतीपत्र आवश्यक) अमोल कोल्हे यांनी चित्रपटावर याआधी दिलेली प्रतिक्रिया : "मी आणि नथुराम गोडसे ही भूमिका: - २०१७ साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं. कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा! याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा!" काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांची प्रतिक्रिया "अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका टाळायला हवी होती. ज्या व्यक्तीने महात्मा गांधींचा खून केला ती भूमिका कशाला करायची? गांधीजी किंवा नेहरुंची भूमिका करायची. इतकी हिंस्त्रक भूमिका कशाला करायची? ते चूक आहे. ती भूमिका साकारताना त्यांनी ती भूमिका किती छान केली ते पण दाखवावं लागेल. ते कलाकार आहेत हे मान्य आहे. पण ते एका पक्षाचे खासदार देखील आहेत. त्यांनी आपल्या पक्षाची आयडोलॉजी घेऊन चालायला हवं", अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी दिली. 'विचारधारेपेक्षा सत्ता टिकवणं जास्त महत्त्वाचं', दरेकरांची खोचक टीका "सर्वप्रथम कलाकृती आहे. कलाकाराने कोणती भूमिका साकारावी हा त्याचा सर्वस्वी निर्णय आहे. तरीही अमोल कोल्हे हे एका पक्षाचे खासदार आहेत. राजकारणात आहे. प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते. पण हुसैन दलवाई यांच्या बोलण्यातून एक आगतिकता मला दिसतेय. इथे विचारधारेपेक्षा सत्ता टिकवणं जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे ते म्हणताय ते चूक आहे. कारण ती भूमिका निभावत असताना जीव ओतून काम करणार. त्या विचाराचा प्रसार करणारण्याचा प्रयत्न करणार. पण अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका जाहीर करण्याची जास्त आवश्यकता आहे. कारण ही भूमिका ते जाहीर करतील, बोलतील. पण आता सगळ्या भूमिका गुंडाळून केवळ सत्ता टिकवण्याचं सर्वाचं अंतिम ध्येय आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा होतील. हुसैन दलवाईंसारखे चुकाही काढतील. पण ते या भूमिकेतून माघार घेतील, असं वाटत नाही", अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या