मुंबई, 16 नोव्हेंबर : भाजप नं 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पण, हे करतानाच, भाजपनं आता 2019 मधील राजकारणाचा संदर्भ देत पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 2019 मध्ये मोदी-शाहांमुळेच घवघवीत यश मिळालं आणि आता शाहांच्या भक्कम पाठबळामुळे राज्यात सत्तांतर झालं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अमित शहांच्या भक्कम पाठबळामुळेच राज्यातलं बेईमानांचं सरकार गेलं. शहा यांच्या सुयोग्य नियोजनामुळंच भाजपनं निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवलं, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता जाहीर कार्यक्रमात स्पष्टपणेच सांगितलं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सत्तांतरात महत्वाची भूमिका पार पाडल्याची सांगताच, फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.
महाराष्ट्रात 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन वर्षातच तीन सरकारं आली. सर्वात आधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं 70 तासांचं सरकार आलं. त्यानंतर अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच सरकार राहिलं. आता साडेचार महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. पण, आता सत्ता मिळवल्यानंतरही भाजप नेत्यांच्या मनात 2014 आणि 2019 मधील युती तुटल्याचं शल्य कायम असल्याचं दिसतंय. स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच हे बोलून दाखवलं आहे. (‘बलात्काराच्या समर्थनात मोर्चा काढणारी भाजप, ताई बाजूला व्हा म्हणल्यावर…’, सुषमा अंधारेंचा घणाघात) ‘2014 मध्ये फक्त 4 जागांसाठी युती तोडली, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यानंतर आता शिवसेनेनंही याला प्रत्युत्तर दिलंय. (न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश, दोन्ही गटांसाठी ही तारीख ठरणार महत्त्वाची) एकंदरीतच, भाजपनं महाविकास आघाडी आणि त्यातही प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात घणाघात सुरू केला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात आधीपासून सुरू असलेल्या संघर्षाला आणखी धार मिळण्याची शक्यता आहे.