अकोला, 12 सप्टेंबर : विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह अकोल्यात पाऊस (Heavy rainfall) झाला. वादळी, वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे तेल्हारा तालुक्यातल्या दानापूर येथे मोठ्या प्रमाणावर केळी, कपाशी, सोयाबीन, पपई, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, पावसासोबत आलेल्या जोरदार हवेमुळे केळी बागांचे, कपाशी, पपईचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई घ्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांना नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिके चांगली बहरात असताना अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. उसनवारी कर्जबाजारी होऊन केलेली पेरणी. मुलाबाळांप्रमाणे जोपासलेलं पिक निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावले जात आहे. जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली. तर काढणीला आलेल्या पिकांचेही नुकसान झाले. एका शेतकऱ्याने 2 एकर कपाशी लागवड केली होती. कपाशी चांगली बहारदार व बोंडानी भरून होती. मात्र, जोरदार पाऊस व वाऱ्याने सर्व कपाशी झोपली. यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन आधार देणे आवश्यक आहे. Video : धक्कादायक! चारवेळा फवारणी करूनही कीड कायम, किटकनाशकंही ठरली फेल 50 टक्के पिकांचे नुकसान वादळी पावसाने जवळपास 50 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. संकटांनी ग्रासलेला शेतकरी पुन्हा एकदा हतबल झाला आहे. पंजाब जायले, विठ्ठल जायले, सुरेश दामधर, सूर्यकांत वैलकर, वसंत राऊत, सुरेश कुऱ्हाडे, शालीग्राम मिसाळ, नंदकिशोर राऊत, महादेव दामधर, दिपक वाघ, आनंदा कतोरे, विनोद खारोडे या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई घ्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. दानापूर, वडगाव वाण रस्ता बंद शनिवारी आणि रविवारी आलेल्या अचानक आलेल्या पावसाने व जोरदार वादळी वाऱ्याने दानापूर, वडगाव वाण रस्त्यावरील झाडे उलमडून पडली यामध्ये विजेचे खांब पडल्याने परिसरातील वीज बंद पडली. रात्रभर नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.