अकोला, 16 सप्टेंबर : अकोट तालुक्यातील रेल जवळील ग्राम पातोंडा ते जवळखेड रस्त्यावरील पुलाची उंची कमी आहे. तसेच नवीन पुलाचे बांधकाम चुकीच्या ठिकाणी होत असल्याने पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहत आहे. पुलावर पाणी आल्याने ये-जा करण्यासाठी जीवघेणी कसरत करण्याची वेळ आली आहे. शाळकरी मुलांना तर अगदी खांद्यावर, कडेवर घेऊन पूल ओलांडून दिला जात आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पातोंडा हे गाव विकासापासून दूर आहे. पावसाळ्यात अनेकदा मुख्य बाजारपेठेशी गावचा संपर्क तुटतो. येथे पर्यायी व्यवस्था देखील नाही. गावाला जोडणारे सर्वच रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. रेल-पातोंडा रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. पातोंडा- जवळखेड हा रस्ताही खराब स्थितीत आहे. बांधकाम चालू असलेल्या पुलाची उंची कमी असून पूल भलत्याच ठिकाणी बांधला जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. हेही वाचा- पारंपारिक शेतीला फाटा देत अख्खं गाव करतयं केळीची शेती, पाहा VIDEO विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान गावातील नागरिकांनी याबाबत संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना समस्या सांगितल्या. परंतु आतापर्यंत उपाययोजना झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नदीला पूर आल्याने अनेकदा गावचा संपर्क तुटतो. पातोंडा येथील विद्यार्थ्यांना चोहोट्टा येथील शाळा, विद्यालयामध्ये पोहोचवता येत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतं असल्याचं ग्रामस्थ चंद्रशेखर नरोकार यांनी सांगितले. प्रशासनाने दखल घ्यावी शाळकरी मुलांना कडेवर, खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. जीव धोक्यात घालून पालक मुलांना शाळेत पाठवत आहेत. नागरिकांचा जीवघेणा प्रवास पाहून तरी तरी प्रशासनाला जाग येईल का, यावर काहीतरी उपाययोजना काढतील का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.