अकोला, 29 जुलै : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र (primary health center Wadegaon) आहे. या इमारतीला गाजर गवत (Carrot grass) आणि रानटी झुडपांनी वेढा घातला आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी देखील साचत आहे. परिणामी मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णासह नातेवाईकांना डासांचा (mosquito) त्रास सहन करावा लागत आहे. या मच्छरांमुळे येथील सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शासनाने लाखो रुपये खर्च करून वाडेगाव येथे 1985 साली प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. मात्र, या आरोग्य केंद्राकडे जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. आरोग्य केंद्राच्या परिसरात अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहे. पूर्ण परिसराला गवतांचा विळखा आहे. साचलेल्या पाण्यामुळे येथे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून रुग्णासह नातेवाईकांना मच्छरांचा सामना करावा लागत आहे. आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीसह कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला रानटी झाडे झुडपे तसेच गाजर गवताने वेढा घातला आहे. या गवतात साप, विंचू यांना आश्रय मिळतो. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील साचलेल्या डबक्यातील पाणी वाहते करून गाजर गवताचे निर्मूलन करावे अशी मागणी होत आहे.
हेही वाचा- रेल्वे स्थानकांवर सुरू झाली 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्कीम', पाहा काय होणार तुमचा फायदा, VIDEO
रुग्ण बरे होण्याऐवजी अधिक आजारी पडतील
आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य आहे. येथे रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु येथील वाढलेले गवत, साचलेले पाणी आणि वाढलेला मच्छरांचा प्रादुर्भाव यामुळे रुग्ण बरे होण्याऐवजी अधिक आजारी पडतील. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर येथील साफसफाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत वाडेगाचे सरपंच मेजर मंगेश तायडे यांनी केली आहे.
फवारणी करण्यात आली
प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेगाव येथील परिसरामध्ये गाजर गवत वाढले आहे. काही ठिकाणी पाणी देखील साचल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडून माहिती घेऊन प्रत्यक्ष चौकशी अधिकारी गेले असता त्यांच्याकडून कळलं की, सततच्या पावसामुळे गवतावर फवारणी करता आली नाही. परंतु मागील तीन दिवसाआधी फवारणी करण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसात गवत नष्ट होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य सहाय्यक अधिकारी विजय जाधव यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News, Maharashtra News