अकोला, 20 फेब्रुवारी: राज्य सरकारने आखून दिलेले नियम धाब्यावर बसवत अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट याठिकाणी शिवजयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. अकोट तालुक्याती कुटासा याठिकाणचा हा प्रकार आहे. याप्रकरणी दहीहंडा पोलिसांनी विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शिवजयंतीच्या उत्साहाला एक वेगळे वळण मिळाले आहे. अकोल्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यानंतर कुटासा गावामध्ये शिवजयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. याप्रकरणी दहीहंडा पोलिसांनी कुटासा येथील आमदार अमोल मिटकरीसह 300 ते 400 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. राज्यात ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार घडले त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं होतं सरकारचं आवाहन
Coronavirus संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीसुद्धा (Shiv jayanti 2021) साधेपणाने साजरी करावी, अशी सूचना राज्य सरकारने दिली होती. शिवजयंती साजरी करण्यासंबंधीच्या गाइडलाइन्स (guidelines for shiv jayanti) ठाकरे सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्या होत्या. या मार्गदर्शक सूचनांनुसार बाईक रॅली, प्रभात फेरी, पोवाडे वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायला बंदी घालण्यात आली होती
दरवर्षीप्रमाणे रॅली, प्रभात फेरी वगैरे आयोजित न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला, प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आयोजित करावा, अशी यात सूचना यात देण्यात आली होती. जास्तीत जास्त 10 लोकांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करायला परवानगी होती. मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच शिवजयंती साजरी करा, असं आवाहन ठाकरे सरकारने केलं आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मसोहळ्यासाठी 100 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी होती.
अकोल्यात कोरोनाची काय परिस्थिती?
दरम्यान कोरोनाची या जिल्ह्यातील आकडेवारी देखील वाढता ग्राफ दाखवणारी आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 24 तासात 242 नवे कोरोना रुग्ण आढळले असून यापैकी 02 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 37 आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 13393 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी सद्यस्थितीत 1624 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत तर 11421 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatrapati shivaji maharaj, Coronavirus, Maharashtra, Mumbai, Shiv jayanti, Violation of curfew rules